मुंबई - विविध मागण्यांसाठी संपावर गेलेल्या राज्यातील वैद्यकीय अधिकार्यांवर ‘मेस्मा’नुसार (महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा कायदा) कारवाई करण्यात येईल, असा इशारा आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांनी मंगळवारी दिला आहे.
आठ तास काम, सहावा वेतन आयोग जानेवारी 2006 पासून लागू करावा, तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती असणार्या डॉक्टरांना पूर्वलक्षी प्रभावाने फायदे द्यावेत आदी मागण्यांसाठी वैद्यकीय अधिकार्यांच्या संघटनेने (मॅग्मो) संपाची हाक दिली आहे. यात राज्यातील सुमारे 5 हजार 310 डॉक्टर सहभागी झाले आहेत. या संपामुळे 4 हजार प्राथमिक आरोग्य केंद्रांतील आरोग्य सेवा कोलमडली असल्याचा दावा ‘मॅग्मो’चे प्रतिनिधी राजेश गायकवाड यांनी केला आहे.
‘डॉक्टरांच्या योग्य त्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक विचार करत आहे. तातडीने संप मागे न घेतल्यास डॉक्टरांवर ‘मेस्मा’नुसार कारवाई केली जाईल,’ असा इशारा आरोग्य मंत्री शेट्टी यांनी दिला.