आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईसह ठाणे शहराला रिंग मेट्रो हवी, केंद्र मदतीला तयार- व्यंकय्या नायडू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- मुंबई मेट्रो-3 प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांची चार दिवसापूर्वी चर्चा झाली होती)
मुंबई- देशात नागरीकरण वाढत असताना तेथील नागरिकांना सर्वसुविधा मिळायला हव्यात. मेट्रो हे एक त्यातील महत्त्वाचे आयुध आहे. यामुळेच संपूर्ण मुंबईसह ठाणे शहर रिंग मेट्रोने जोडण्यासाठी प्रयत्न करावा. राज्य सरकार आणि एमएमआरडीए यांनी याचा आराखडा बनवून केंद्राकडे पाठवावा तो त्वरीत मंजूर करू असे आश्वासन व्यंकय्या नायडू यांनी दिले. केंद्र आणि राज्य सरकार समन्वयाने काम करील. देशासाठी व देशातील जनतेसाठी आपण सर्वजणांनी टीम इंडिया म्हणूनच काम केले पाहिजे अशा आशावाद व्यक्त केला. पुणे मेट्रोबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यालाही लवकरच मंजूरी मिळेल असेही नायडूंनी सांगितले.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सर्वप्रथम मी नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडूंचे स्वागत करतो व आभार मानतो. मेट्रो-3 च्या उद्धघाटनाला निमत्रंण देताच त्यांनी आपले ठरलेले इतर कार्यक्रम रद्द करून येथे आले. मुंबईसह महाराष्ट्रात नागरीकरण वेगाने वाढत आहे. यासाठी जास्तीत जास्त पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा आम्हचा प्रयत्न सुरु आहे. मागील चार-पाच वर्षात मुंबईतील वाहतुकीच्या प्रश्नांसह अनेक बाबींचा चेहरा-मोहरा बदललेला आहे. मुंबई मेट्रो-3 हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. अजून खूप कामे करायची आहेत केंद्राने सहकार्य करावे. मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्याचा आमचा मानस आहे. याचबरोबर मुंबई शहर हे समुद्रकिनारी वसल्याने अनेक किचकट प्रक्रियांना सामोरे जावे लागते. याबाबत केंद्र सरकारने काही धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. महाराष्ट्रात टाऊन प्लॅनिंग व अर्किटेक्चरचे देशातील तिसरी संस्था केंद्राने मुंबईत उभारावी. मुंबईतील खासदारांनी याबाबत पाठपुरावा करावा. राज्य सरकार आपले काम चोख बजावेल असेही मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले.
केंद्र सरकार आणि राज्य सरकारने एकदिलाने काम केले पाहिजे. कोणाचाही अपमान, अनादर होणार नाही याची काळजी प्रत्येकानेच घेतली पाहिजे, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला खडे बोल सुनावले.
मुंबईतील मेट्रो-3 या कुलाबा-वांद्रे- अंधेरी (सीप्झ) या पहिल्या भुयारी मेट्रो मार्गाच्या भूमीपूजनाचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील, मुंबई उपनगरचे पालकमंत्री नसीम खान, सुरेश शेट्टी, सचिन अहिर यांच्यासह मुंबईतील सर्व खासदार उपस्थित होते. मुंबईतील मरोळ येथील अंधेरी-घाटकोपर रोडवर अग्निशमन केंद्राजवळ भूमिपूजनाचे उद्घाटन करण्यात आले.
मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनविण्याचा ध्यास राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार व जपानमधील जायका या संस्थेच्या माध्यमातून हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी 23 हजार 136 कोटी रूपये खर्च करणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली मुंबई मेट्रोचे काम सुरु आहे. मुंबई मेट्रो-1 ची सेवा सुरु झाली आहे तर, मेट्रो-2 चे काम सुरु आहे. मेट्रो-3 चे आज भूमिपूजन झाले. मेट्रो-3 हा प्रकल्प संपूर्णपणे भुयारी असून, या मार्गावर 27 स्थानके असतील. एकून 32.5 किमी लांबीचा हा भुयारी मार्ग असेल. या मेट्रोला अद्यावत व वातानुकूलित सेवा-सुविधा उपलब्ध असेल. हा प्रकल्प 7 वर्षात पूर्ण होणे अपेक्षित असून यासाठी 23 हजार 136 कोटी रूपये खर्च येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर यातून दररोज 17 लाख प्रवासी प्रवास करू शकणार आहेत.
भुयारी असलेल्या मेट्रो-3 द्वारे उत्तर-दक्षिण मुंबईच्या भागाला जोडण्यासाठी फायदा होणार आहे. तसेच हा मार्ग रेल्वे सेवा उपलब्ध नसणा-या परिसराशी जोडला जाणार आहे. नरिमन पॉईंट, वांद्रे-कुर्ला-संकुल, अंधेरी एमआयडीसी आणि सीप्झ अशा महत्त्वपूर्ण केंद्रांशी मेट्रो-3 जोडली जाणार आहे. नागरिकांचा सहज व सोयीस्कर प्रवास व्हावा यादृष्टीने सर्व सुविधांचा विचार करून डिझाईन केले आहे. याचबरोबर चर्चगेट, सीएसटी, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, दादर, मेट्रो-1चे मरोळ नाका स्थानक आणि मोनोरेलचे महालक्ष्मी स्थानक येथे मार्गांची अदलाबदल करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
पुढे वाचा व पाहा, मेट्रो-3 कोणत्या कोणत्या ठिकाणावरून जाणार आहे...