सानिका एक मध्यमवर्गीय सुशिक्षित मुलगी. सध्या एका नामांकित कंपनीत नोकरी करते. तीन महिन्यापूर्वीची ही गोष्ट. रविवारची संध्याकाळ होती. पावसात भिजल्यामुळे गेले दोन दिवस सर्दी झाली होती आणि अंगात कणकणही होती. घरगुती उपाय करूनही काही फरक पडला नाही सुट्टीचा दिवस असल्याने आजूबाजूचे लहान दवाखाने बंद होते म्हणून मोपेड घेऊन ती जवळच्या हॉस्पीटल मध्ये गेली. डॉक्टरांनी तपासले आणि औषधं लिहून दिली. हॉस्पीटलवरून परत येताना चौकात एक मोठे मेडिकलचे दुकान दिसले. औषधे घेऊन टाकावी ह्या विचाराने ती आत गेली.
तिथे काउंटरवर अटेंड करायला उभ्या दोन तीन जणांपैकी एका माणसाने तिला विचारले "क्या चाहिये मॅडम?". तिने प्रिस्क्रीपशन हातात दिले. साधारण पंचवीस वर्षाचा तो मुलगा असावा. त्याने ते प्रिस्क्रीपशन काउंटरवरच्या दुसऱ्या माणसाच्या हातात दिले. त्याने तिला निरखून बघितले आणि विचारले,"क्या मॅडम, तबियत खराब है क्या? ". ती हो म्हणाली आणि फोनवर मेसेज बघत दुसऱ्या काउंटरवर गेली. त्या माणसाने तिला आवाज देऊन जवळ बोलावले आणि म्हणाला, " मॅडम इसमेसे एक दवाई हमारे पास नाही है. ". तेवढ्यात दुसरा मुलगा त्याला म्हणाला, 'अरे अक्रम, वो शांतीनगर वाली ब्रांच मैं फोन करके पुछ उधर स्टॉक में है क्या?".
पहिला मुलगा त्याला म्हणाला, "ठीक है भाई!". त्याने फोन करून त्यांच्या दुसऱ्या दुकानात फोन करून विचारले. आणि त्या एकमेकांना हावभावाने होकार दिला. आणि सानिकाला म्हणाला, "हमारे दुसरी दुकान पर जाना पडेगा." ती म्हणाली,"ठीक ही
आप बाकी दवाईया दे दो, बाकी मैं दुसरी दुकान से ले लुंगी." त्यावर तो म्हणाला, "ठीक है मॅडम मैं आपके साथ आपके मोपेडपर आता हुं और आपको दवाई दिलवा देता हुं "
तिला थोडं विचित्र वाटणं साहजिकच होतं. ती म्हणाली, "नाही भैया मैं ले लुंगी. आप बाकी दवाईयां दे दिजीये". तेव्हा त्याने एक संशयास्पद नजर टाकून तिला विचारले, "क्या मॅडम, किधर रहती हो. मुझे बता दो. मैं आता हूं दवाई लेकर आपके घर. "तिने रागाने त्याच्याकडे बघितले आणि म्हणाली, "आपको जितना बोला हैं उतना करो. अगर नहीं जमता हैं तो प्रिस्क्रिप्शन वापीस करो."
तिला आतून खूप असुरक्षीत वाटत होते. ती मँनेजरकडे गेली आणि घडलेला प्रकार त्याला सांगितला. त्याने तिला हमी दिली की तो त्यांना समजावेल आणि त्यांच्या वतीने माफी देखील मागितली. आणि असलेल्या औषधांचे बिल बनवायला सांगितले. आणि बिल वर असलेले तिचे नाव टाकायला सांगितले. आणि हळू आवाजात त्याला म्हणाला "लडकी भडक गयी हैं, अभी कुछ मत बोल". आणि त्या मुलाच्या पाठीवर थाप देऊन मँनेजर त्याच्या केबिन मध्ये निघून गेला.
त्यांचा संवाद सानिकाच्या लक्षात आला होता. क्षणभर तिला काही सुचेनासे झाले पण तिने धीर न सोडता त्याला उत्तर देण्याचे ठरवले. ती पोलिस स्टेशनला गेली आणि त्यांना सर्व घटना सांगितली. त्यांनी तिला लेखी तक्रार द्यायला आणि पुढचं ते बघून घेतील असे सांगितले . तिने ते करण्याचीही तयारी दाखवली. तिने घरी फोन केला आणि आईला घडलेल्या प्रकाराबद्दल सांगितले. तेव्हा आई म्हणाली "तक्रार करून नसती संकट ओढवून घेऊ नकोस. उगाच आणखी मागे लागायचे ते लोकं. तू परत दुकानात जाऊ नको". तिने फोन ठेऊन दिला. तिने तिच्या वडिलांना फोन लावून त्याचं मत विचरले. तेव्हा त्यांनीही आईच्या म्हणण्याचे समर्थन केले.
मनात संताप होत होता. घरून सपोर्ट मिळत नसल्याने तिला एकाकी लढणे भाग होते. आई बाबांची काळजी काही अंशी खरी असली तरी माघार घेऊन गप्प बसणे हा उपाय नव्हता. तिने वृत्तपत्रात काम करणाऱ्या तिच्या अभय नावाच्या मित्राला कॉल केला आणि घडलेल्या प्रकाराबद्दल सांगितले. घटित प्रकार ऐकून तो तडक त्याठिकाणी आला आणि तिला तक्रार नोंदवण्यास प्रोत्साहन दिले. दोघेही पोलिसांना घेऊन त्या दुकानात गेले. दुकानाचा मॅनेजर आणि ती दोन मुले ह्यांना पोलिसांनी अटक केली. आणि त्या मुलांकडून पुन्हा त्रास होणार नाही ह्याची काळजी आम्ही घेऊ असे सांगितले.
तिने अभयचे आभार मानले. त्यानेही तिच्या साहसाचे कौतुक केले.
कळवा तुमचा विचार - maninidivyamarathi@gmail.com वर.