आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईत पहाडी गोरेगाव येथे म्हाडा उभारणार 5 हजार घरे, प्रकल्पाच्या निविदा लवकरच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पहाडी, गोरेगाव येथे विविध उत्पन्न गटाकरिता परवडणाऱ्या दरातील सुमारे पाच हजार सदनिकांचा गृहप्रकल्प  मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा विभागीय घटक) उभारण्यात येणार आहे. मुंबई मंडळातर्फे या गृहप्रकल्पाच्या उभारणीकरिता या आठवड्यात निविदा मागविण्यात येणार आहेत. नजीकच्या भविष्यातील हा महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) मुंबईतील सर्वात मोठा प्रकल्प गृहप्रकल्प ठरतो. 


     पहाडी गोरेगाव, बांगूर नगर, गोरेगाव पश्चिम येथील सुमारे 18 एकर परिसरात उभारण्यात येणारा हा गृहप्रकल्प 'अ' आणि 'ब' अशा दोन भूखंडात विभागण्यात आला आहे. सुमारे 41,614  चौरस मीटर व्याप्ती असलेल्या भूखंड 'अ' वर अंदाजे 2,950 सदनिका उभारण्यात येतील. पैकी 1,665 सदनिका अत्यल्प उत्पन्न गटासाठी, 555 सदनिका अल्प उत्पन्न गटासाठी, 417 सदनिका मध्यम उत्पन्न गटासाठी, 313 सदनिका उच्च उत्पन्न गटासाठी बांधण्यात येणार आहेत. तर 29,740 चौरस मीटर व्याप्ती असलेल्या भूखंड  'ब' वर  अंदाजे 2,109 सदनिका उभारण्यात येणार आहेत. पैकी 1,190 सदनिका अत्यल्प उत्पन्न गटासाठी, 397 सदनिका अल्प उत्पन्न गटासाठी, 298 सदनिका मध्यम उत्पन्न गटासाठी, 224 सदनिका उच्च उत्पन्न गटासाठी बांधण्यात येणार आहेत.     

 

     सुमारे पंचवीस वर्षांपासून म्हाडाच्या नावे असलेली ही 25 एकर जमीन न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकली होती. सदरील जमीन शासनाने 50 वर्षांपूर्वी गायरान जमीन म्हणून देण्यात आल्याचे सांगून कुसुम शिंदे नामक महिलेने या जागेवर आपला हक्क असल्याचा दावा कोर्टात सादर केला होता. सदरील जमीन महाराष्ट्र शासनाच्या मालकीची असून या जमिनीवर म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांकरिता गृह योजना राबविण्याकरीता संपादित करण्यात आली होती. मात्र, दरम्यानच्या काळात या महिलेने सदरील भूखंड एका विकासकाला विकला होता. या पार्श्वभूमीवर या खटल्याने शहर दिवाणी न्यायालय ते सर्वोच्च न्यायालय असा प्रवास तब्बल पंचवीस वर्षे केला.

 

मुंबई हाय कोर्टात व सुप्रीम कोर्टात शिंदे व विकसक यांचे जमिनीवरील हक्क सांगण्याकरिता केलेले सर्व दावे फेटाळून लावले. याशिवाय सरकारी जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला म्हणून एक कोटी रुपयांचा दंड ही त्यांच्यावर ठोठावण्यात आला होता. अशा प्रकारे हा खटला म्हाडाकरिता एक ऐतिहासिक उपलब्धी ठरतो. गोरेगाव लिंक रोड वरील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या भूखंडावरील अस्तित्वात असलेले व सातत्याने होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी म्हाडाच्या अभियंत्यांनी प्रयत्नांची शिकस्त केली होती. हा प्रकल्प येत्या तीन वर्षात होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...