आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Microsoft Going To Start Cyber Security Center In Pune

स्मार्ट एमआयडीसीला मायक्राेसाॅफ्ट उत्सुक, पुण्यात सायबर सुरक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या मायक्रोसॉफ्ट समूहाने राज्यात एक स्मार्ट औद्योगिक वसाहत व पुणे येथे सायबर सुरक्षा केंद्र उभारण्याचे जाहीर केले आहे. शिवाय शासनाच्या डिजिटल व्हिलेज उपक्रमास सहकार्य करण्याचेही कंपनीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेत मान्य केले.
सिएटलमधील मायक्रोसॉफ्टच्या सायबर क्राइम सेंटरला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. या वेळी मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांच्याशी राज्याच्या शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा झाली. राज्यातील डाटा सेंटरच्या माध्यमातून मायक्राेसाॅफ्टने केलेल्या सहकार्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रशंसा केली. मेक इन महाराष्ट्रमध्ये हे सेंटर्स अाहेत. लघु व मध्यम उद्योगांसाठी तंत्रज्ञानविषयक साह्य, क्लाऊड सर्व्हिसेस, सेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर आदी विषयांवर विचारविनिमय झाला. पुणे येथे सायबर सुरक्षा केंद्र तसेच राज्यात एक स्मार्ट औद्योगिक वसाहत उभारण्यात येईल, असे या वेळी मायक्रोसॉफ्टतर्फे सांगण्यात आले. स्मार्ट एमआयडीसीसाठी कंपनीकडून लवकरच जागेची निश्चिती करण्यात येणार आहे. पथदर्शी प्रकल्प म्हणून मेळघाटातील एक आदिवासी खेडे दत्तक घेऊन त्यास विशेष आरोग्य सेवा देण्यात येणार असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले.

बोइंगकडून प्रशिक्षण
बोइंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी रेमंड कॉनर यांच्याशी नागपूरजवळच्या मिहानमधील बोइंगच्या एमआरओ प्रकल्पाला गती देण्यावर चर्चा झाली. राज्यात नागरी विमान क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या उपक्रमात मदतीचे अाश्वासन बोइंगने दिले. त्याच्या प्रशिक्षणासाठी पुढाकार घेण्यास सहमती दर्शवली.

अॅमेझॉनची गुंतवणूक
ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसचे सरव्यवस्थापक ज्यो मिनॅरिक यांच्याशी चर्चा झाली. संस्थेचे टोनी बोईटो, हीथर डॉवनी या वेळी हजर होते. विस्तारित केंद्राची उभारणी व गुंतवणुकीवर चर्चेसाठी ॲमेझॉन उत्सुक असल्याचे सांगण्यात आले. राज्यात उपक्रमासाठी सहकार्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिले.

सुरक्षेसाठी मायक्रोसाॅफ्टचे विशेष ॲप्लिकेशन : मुंबईत दोन मोठी डाटा सेंटर्स उभारल्यानंतर मायक्रोसॉफ्टचा राज्याच्या सुरक्षिततेसाठी खास ॲप्लिकेशन काढण्याचा प्रयत्न आहे. यामुळे राज्यात सुरक्षेची गरज असेल त्या व्यक्तीचा शोध घेऊन त्यांना शासकीय यंत्रणेकडून तत्काळ सुरक्षा पुरवणे शक्य होईल.