आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयडीसीच्या जमिनी होणार अतिक्रमणमुक्त

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) ताब्यातील जमिनी अतिक्रमणमुक्त करण्याची योजना आखण्यात आली असून त्याची सुरुवात ठाणे आणि नवी मुंबई येथून होणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर राज्यातही त्याची अंमलबजावणी होईल. या जागांवर अतिक्रमण केलेल्या झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसनही करण्यात येणार असल्याची माहिती उद्योग विभागातील अधिका-याने ‘दिव्य मराठी’ला दिली.
ठाणे येथील वागळे इस्टेट आणि नवी मुंबईतील टीटीसी येथील एमआयडीसीची सुमारे 400 एकर जमिनीवर सध्या अतिक्रमण झालेले आहे. ही जमीन अतिक्रमणमुक्त करण्याची योजना एमआयडीसीने आखली आहे. अतिक्रमण काढल्यानंतर टीटीसी विभागात 130 एकर तर वागळे इस्टेट भागात सुमारे 76 एकर जमीन उपलब्ध होऊ शकते. या जमिनीचा सध्याचा बाजारभाव 600 कोटींपेक्षा अधिक आहे. एमआयडीसीच्या जागेवरील झोपड्यांचे पुनर्वसन करण्यासाठी एक योजना तयार करण्यात येणार असून त्यांना झोपडपट्टी क्षेत्रातच 269 चौरस फूटाचे घर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे एमआयडीसीला अतिरिक्त जमीन मिळणार आहे. अतिक्रमणे हटविल्यानंतर उपलब्ध होणा-या जमिनीपैकी 50 टक्के जमीन लघु व मध्यम उद्योग क्षेत्रासाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय घेतल्याचेही संबंधित अधिका-याने सांगितले.
एमआयडीसीच करणार विकास - यापूर्वी उद्योग विभागाने गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून एमआयडीसी विभागातच झोपडपट्टी पुनर्विकास योजना तयार केली होती. परंतु आता गृहनिर्माण विभागाने एमआयडीसीला स्वत:च सदर जमिनीचा विकास करण्याची परवानगी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या एमआयडीसी संचालक मंडळाच्या बैठकीत झोपडपट्टी पुनर्विकासाचा निर्णय घेतल्याचे समजते. ठाणे आणि नवी मुंबईतील योजना यशस्वी झाल्यानंतर राज्यात अन्य ठिकाणीही अतिक्रमण झालेली जमीन मोकळी करण्याची विशेष योजना एमआयडीसीतर्फे हाती घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.