आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Middle Men Eradication In Regional Transport Office First Day Failed

दलालांचा विळखा सैल, मुजोरी कायम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : नाशिकचे आरटीओ कार्यालय सोमवारी एजंटमुक्त करण्यात आले. त्यानंतर कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आरटीओ अधिकारी प्रत्येक नागरिकाची कागदपत्रे तपासून त्यांना आत सोडत होते.
मुंबई - राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालये दलालमुक्त करण्याच्या अभियानाच्या पहिल्याच दिवशी मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगड या चारही ठिकाणच्या दलालांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे या परिसरातल्या सर्वच परिवहन कार्यालयात दलाल कुंपणाबाहेर आणि सर्वसामान्य नागरिक रांगेत असेच चित्र होते. मात्र, परिवहन आयुक्तांनी सुरू केलेले हे अभियान जरी वरकरणी चांगले दिसत असले तरी आमच्याशिवाय परिवहन विभागाचा कारभार चालवणे कठीण असल्याची ‘बढाईखोर’ भाषा या दलालांनी केली आहे.

साेमवारी मुंबई परिसरातल्या विविध प्रादेशिक परिवहन कार्यालयातले कामकाज दलालांविनाही सुरू होते. सकाळच्या सुमारास कार्यालयात रांगा दिसत होत्या, मात्र दुपारनंतर गर्दीचा भर ओसरला. सुरक्षा कर्मचारी येणा-या जाणा-यांचे काय काम आहे हे विचारून त्यांना मार्गदर्शन करताना दिसत होते, तर प्रवेशद्वारावरील पोलिसांच्या बंदोबस्तामुळे दलालही कार्यालयापासून चार हात लांब उभे असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. ‘दलालमुक्त वातावरणाबद्दल आम्ही आयुक्तांचे अभिनंदन करतो. मी इतर वेळीही दलालांची मदत घेत नाही, मात्र आता दलालमुक्तीची ही पद्धत कायमस्वरूपी सुरू राहण्यासाठी आयुक्तांनी प्रयत्न करावेत,’ अशी प्रतिक्रिया आपल्या चालक परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी आलेल्या वरळीच्या आशिष पिल्लई यांनी व्यक्त केली.

‘एमएच एक ते सहा’च्या कार्यक्षेत्रात १५०० दलाल
मुंबई शहर परिवहन अधिकारी कार्यालयाच्या परिसरात जवळपास दीडशे ते दोनशे दलालांनी कार्यालये थाटली आहेत. त्यांचे परिवहन अधिका-यांशीही ‘सुमधुर’ संबंध असल्याची सर्वत्र चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, पालघर, नवी मुंबई, पनवेल आणि पेण या प्रादेशिक कार्यालयांमध्ये जवळपास १५०० ते १७०० दलाल कार्यरत आहेत. यावरून दलालांनी परिवहन विभागाच्या कारभाराचा किती खोलवर ताबा घेतला आहे हे स्पष्ट होते. एमएच ०१ ते एम एच ०६ या नंबर सिरीज या भागातल्या आहेत.

आधी खिल्ली, मग पाठिंबा
दलालमुक्तीबाबत परिवहन आयुक्तांनी काढलेल्या आदेशाची परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी उडवलेली खिल्ली त्यांच्या अंगलट येत असल्याचे लक्षात येताच रावतेंनी आता या आदेशाचे समर्थन केले आहे. रविवारी याबाबत बोलताना ‘एजंट म्हणजे काय? एजंटांची व्याख्या व्यापक आहे,’ असे सांगून अप्रत्यक्षपणे एजंटांचे समर्थनच केले होते. मात्र, सोमवारी दलालमुक्तीच्या आदेशाची अंमलबजावणी होत असताना पत्रकारांनी पुन्हा प्रश्न विचारल्यानंतर मात्र रावतेंनी घूमजाव केले. ‘आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला असून आयुक्तांच्या भूमिकेला पूर्ण पाठिंबा आहे,’ असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
‘मुंबई शहर’चे अधिकारी रजेवर
मुंबई शहराचे प्रादेशिक परिवहन अधिकारी के. टी. गोलानी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला गेले असून येत्या २५ जानेवारीपर्यंत सुटीवर असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयातून मिळाली.

‘आमच्याशिवाय कारभार शक्य नाही’
आयुक्तांच्या या निर्णयाविरोधात मुंबई, ठाणे, रायगड आणि नवी मुंबई परिसरातील दलालांनी संप पुकारला आहे. दुपारी एकच्या सुमारास ताडदेव परिवहन कार्यालयाबाहेर मुंबईतल्या विविध कार्यालयाबाहेर सक्रिय असणा-या दलालांनी एक बैठक घेतली. मात्र ही बैठक कोणत्याही निर्णयाविना संपली. यापैकी रोमी नावाच्या एका दलालाशी दिव्य मराठीने संपर्क साधला असता, ‘हमारे सिवा आरटीओ का काम नहीं होगा..आठ दिन अगर हम नहीं रहेंगे ना तो ये पुरी व्यवस्था ठप्प हो जाएगी, देख लेना..,’ अशी बढाईखोर प्रतिक्रिया त्याने दिली.