मुंबई- स्वत:ला वाघ समजणारे उद्धव ठाकरे फक्त मुंबईत कसे बसतात, आमच्या हैदराबादमध्ये का येत नाहीत असा सवाल करीत तेथे येऊन दाखवा, असे थेट आव्हान एमआयएमचे नेते अकबरूद्दीन ओवेसींनी दिले आहे. गुंडगिरीच्या जोरावरच नारायण राणे मोठे झाल्याचीही टीका ओवेसी यांनी केली.
ओवेसी यांनी वांद्रे (पूर्व) पोटनिवडणुकीत वांद्र्यात सभा घेतली. प्रचाराच्या अंति टप्प्यात त्यांनी उद्धव ठाकरेंसह नारायण राणेंना लक्ष केले.
ओवेसी म्हणाले, उद्धव ठाकरे हे स्वतला वाघ समजतात. मात्र ते मातोश्री व मुंबईच्या बाहेर पडत नाहीत. 'हम हैदराबादवाले पहले नांदेड आए, नांदेड से औरंगाबाद आए, औरंगाबाद से भायकला आए और अब बांद्रा आए है, बांद्रा के बाद मातोश्री भी जाएंगे," असे सांगत आमच्यात हिंमत आहे म्हणूनच आम्ही मुंबईत येतोय. मात्र स्वत:ला वाघ समजणा-या उद्धव ठाकरेंनी आमच्या हैदराबादमध्ये येऊन दाखवावे, असे आव्हान दिले.
नारायण राणेंवर टीका करताना ओवेसी म्हणाले, गुंडगिरी करूनच हा माणूस मोठा झाला आहे. अन्यथा या माणसाला कोणीही ओळखले नसते. महाराष्ट्रात मुस्लिमांना न्याय मिळत नाही त्यामुळे भाजप-शिवसेना व काँग्रेस-राष्ट्रवादीला दूर ठेवा. त्यांना मते देऊ नका. जर महाराष्ट्रात आमचे सरकार असते तर मुस्लिमांच्या विकासासाठी तीन हजार कोटींची तरतूद केली असती असेही ओवेसींनी सांगितले.