आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एमअायएम’ अामदारांना हाय मुख्यमंत्री फडणवीसांवर भरवसा!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुस्लिम आरक्षण मुद्द्यावरून ‘एमआयएम’चे दोन्ही आमदार कॉंग्रेस- राष्ट्रवादीवर शुक्रवारी तुटून पडले, मुख्यमंत्र्यांवर मात्र त्यांनी विश्वास व्यक्त केला. तर ‘केंद्र व राज्य सरकार मुस्लिमांच्या हिताचे अनेक निर्णय घेत आहेत. अामचे अनेक प्रयत्न पाहिल्यानंतर मला खात्री आहे, की मुस्लिम समाज आमच्याच बरोबर राहील,’ असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.   

एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील म्हणाले, ‘मुस्लिम आरक्षणाची बाजू घेण्याची कॉंग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका म्हणजे “मगरमछ के आंसू” आहेत. गेली पंधरा वर्षे सत्ता होती तेव्हा झोपला होता का?’ मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला अपेक्षा आहेत.’ मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे चिडलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी “ये अंदर की बात है, एमआयएम-बीजेपी साथ है,” अशी घोषणाबाजी सुरू केली.  अामदार जलील म्हणाले, “कॉंग्रेस-राष्ट्रवादीला फक्त मुसलमानांची मते हवीत. निवडणुकीपुरते त्यांना आमच्याशी नाते हवे असते. दोन दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाचा विषय आला तेव्हा सगळे आमदार एकमुखाने मागणी करत होते. मुस्लिम आरक्षणावर मात्र त्यांचे फक्त मुस्लिम आमदारच बोलत होते. हेच त्यांचे ‘मगरमछ के आंसू’ आहेत. एवढी वर्षे सत्तेत असताना त्यांनी आम्हाला आरक्षण दिले नाही.” कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून आम्हाला आता मुळीच आशा नाहीत. शिवसेनेला, भाजपला आम्ही दोष देत नाही. कारण ते फार काळ सत्तेत नव्हते. पण मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला आशा आहे. ते आमच्या हिताचा निर्णय घेतील, असा विश्वास वाटतो, असे जलील म्हणाले.   

आरक्षणाच्या मागणीला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, “गेल्या सत्तर वर्षात मुस्लिम समाज मागे राहिला याबद्दल शंका नाही. हे कोणामुळे झाले, यावर राजकीय टिप्पणी करायची नाही.’ मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याच्या विरोधी प्रतिक्रिया कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी जागेवर बसूनच दिल्या. त्यावर मुख्यमंत्र्यांनी “मला बोलायला लावू नका. मी बोललो तर तुमची तोंडे गप्प होतील,” असे सुनावले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे भाषण शांततेत सुरू झाले.  

एमआयएमचे मुस्लिम खासदार भाजप मुख्यमंत्र्यांची स्तुती करत असल्याचे पाहून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील बोलण्यासाठी उठले. “भारताच्या उपराष्ट्रपतींचे भाषण तुम्ही वाचलेले दिसत नाही,” असा खोचक प्रश्न त्यांनी  विचारला. मागच्या पन्नास वर्षात काय घडले हे मी सांगत बसत नाहीत. पण जे झाले त्यामुळे जलील आमदार झाले, असे विखे-पाटील म्हणाले.  मुस्लिम आरक्षणातली अडचण आणि मुस्लिमांचे प्रश्न या संदर्भात सरकार अत्यंत सकारात्मक आहे. या विषयांवर चर्चा करण्यासाठी एका महिन्याच्या आत मुस्लिम आमदारांबरोबर बैठक लावून सर्व मुद्द्यांचा खुलासा केला जाईल. संविधानाच्या अधीन राहून मुसलमान आरक्षणासाठी सर्व प्रयत्न करण्यास सरकार बांधील आहे, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.    

मुस्लिम समाज आमच्याच सोबत राहील : मुख्यमंत्री  
‘दोन वर्षांत अल्पसंख्याक विभागाच्या योजनांवर खर्च झालेला निधी गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत दोन पटीने जास्त आहे. केंद्राने सुरू केलेल्या कौशल्य विकासाच्या योजनेच्या माध्यमातून मुस्लिम तरुणांना कौशल्य विकासाचे धडे दिले जात आहेत. अल्पसंख्याक समाजाकरता खासगी महाविद्यालयांमध्ये शिष्यवृत्ती लागू केली आहे. अल्पसंख्याकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सगळे प्रयत्न सरकार करेल. मला खात्री आहे की प्रामाणिक प्रयत्न पाहून मुस्लिम समाज आमच्याच सोबत राहील,’ असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. तसेच मुस्लिमांमधल्या काही जातींना लागू असलेल्या ओबीसी-एससी-एसटी आरक्षणाला या सरकारने धक्का लावलेला नसल्याचे ते म्हणाले.  
बातम्या आणखी आहेत...