आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MIMकडून मुस्लिम तरुणांना ड्रग्जचा पुरवठा, नितेश राणेंचा अाराेप; बंदीची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘एमआयएम हा पक्ष मुस्लिम तरुणांसाठी धोकादायक अाहे. या पक्षाने मुस्लिम तरुणांना ड्रग्जची सवय लावली आहे. वांद्रे पूर्व पोट निवडणुकीत हे आम्ही अनुभवले अाहे. ओवेसी बंधूंच्या भाषणामुळे कोणी एमआयएमकडे अाकर्षित होत नसून कोकेन, गांजा, चरस याचा पुरवठा या पक्षाकडून होत असल्यानेच तरुणांचे लोंढे त्यांच्याकडे जातात,’ असा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे धाकटे चिरंजीव व काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीत राणेंचा पराभव झाल्यामुळे अाता त्याचे पडसाद उमटत अाहेत. अामदार नितेश राणे यांच्या बाेलण्यातून ही अस्वस्थता जाणवत हाेती. ते म्हणाले, ‘एमआयएम हा पक्ष मुस्लिम तरुणांना बिघडवण्याचे काम करत आहे. माझा हा आरोप सिद्ध करायचा असेल तर एमआयएमच्या कार्यकर्त्यांची ड्रग्ज चाचणी करायला हवी. यामधून सत्यता बाहेर येईल. वांद्र्याच्या निवडणुकीत एमआयएमकडून ड्रग्जचे वाटप होत असल्याचे आम्ही पाहिले आहे. प्रचारादरम्यान आम्हाला ते दिसून आले. म्हणूनच एमअायएम हा देशासाठी विघातक असा पक्ष आहे. त्यावर बंदी घालावी,’ अशी मागणीही राणेंनी केली.

आमदारकी साेडण्यास तयार
नारायण राणे सलग दुसऱ्यांदा पराभूत झाल्याने आता त्यांच्यासाठी नितेश हे आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची चर्चा अाहे. याविषयी नितेश म्हणाले, ‘ राणे हे माझे गुरू असून त्यांच्यामुळेच माझी ओळख आहे. राणेंसाठी मी राजीनामा खिशात घेऊनच फिरतो.’

काँग्रेसवरही प्रहार : नेत्यांची नाही, कार्यकर्त्यांची गरज!
वडिलांच्या पराभवाने खचलेल्या नितेश यांनी काॅंग्रेस पक्षाला खडे बाेल सुनावले. ‘वांद्रे पोटनिवडणुकीत राणेंनी सर्व ताकद पणाला लावली, पण काँग्रेस पक्ष कमी पडला. काँग्रेसला आज नेत्यांची नव्हे कार्यकर्त्यांची गरज आहे. पक्षाची ताकद असती तर विजय राणेंचाच होता. त्याउलट बाळासाहेब ठाकरेंनी कार्यकर्त्यांची फौज उभी केली. त्यांनी गटप्रमुखांची मोठी साखळी तयार केली. बाळासाहेबांचे हे काम चांगलेच होते अाणि चांगल्याला चांगलं म्हणणं हा माणूसकीचा धर्म आहे,’ असे नितेश म्हणाले.

शिवसैनिकांचे पत्ते ठाऊक
‘पराभवानंतर आमच्या घरासमोर फटाके फोडणाऱ्या शिवसैनिकांचे पत्ते आम्हाला ठाऊक आहेत. त्यांना आम्हीही उत्तर देऊ शकतो. मग पुढे काय होईल, याची जबाबदारी पाेलिसांनी घ्यावी. राणे हेच खरे मर्द आहेत. उद्धव ठाकरे एक सभा सोडली तर बाहेर पडले नाहीत. त्यांना शाखाप्रमुखांचीही वर्षानुवर्षे माहिती नाही. ते कसले मर्द?’ अशी टीकाही नितेश यांनी केली.
नितेश यांचे आरोप बिनबुडाचे : ‘एमआयएम’
नितेश यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्यांनी हे आरोप का केले, हा प्रश्नच आहे. त्यांनी असे काही होत असल्याचा अनुभव घेतला असेल तर तत्काळ पोलिसांना कळवायला हवे होते. ते निकालानंतरच्या दुस-या दिवसाची का वाट पाहत होते. अशा आरोपांना आम्ही किंमत देत नाही. आधी पुरावे द्या आणि मग बाेला, असा टोला एमआयएमचे अामदार वारिस पठाण यांनी लगावला.