आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर राज्याचे ‘तोमर’! काँग्रेसचा घणाघाती अाराेप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेबाबत निवडणूक आयोगाला दिशाभूल करणारी माहिती दिली अाहे. महाराष्ट्राचे ‘ताेमर’ असलेल्या या मंत्र्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी बुधवारी केली अाहे.
पत्रकारांशी बोलताना सावंत म्हणाले की, संशयास्पद शैक्षणिक कागदपत्रांमुळे दिल्लीचे माजी कायदामंत्री व ‘अाप’चे नेते जितेंद्रसिंह तोमर यांना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईचे भाजपने समर्थन केले, परंतु त्यांच्याच पक्षाच्या एका मंत्र्यानेही हाच गुन्हा केला अाहे. परतूरचे भाजप अामदार व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी आपल्या शिक्षणाविषयी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात वेगवेगळी माहिती नमूद केली आहे. २००४ आणि २००९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी १९९१ मध्ये नाशिक येथील मुक्त विद्यापीठातून बीए प्रथम वर्ष केल्याचे म्हटले आहे. तर २०१४ च्या निवडणुकीत मात्र त्यांनी आपण केवळ पाचवी उत्तीर्ण असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. तर वेबसाइटवर त्यांनी ‘बीए’ असल्याची खोटी माहिती दिली आहे.

खोटी माहिती दिली नाही : लाेणीकर
अापण निवडणूक आयोगाला कोणतीही खोटी वा चुकीची माहिती दिलेली नाही. जे सत्य आहे तेच दिले आहे, असे स्पष्टीकरण लोणीकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिले. मुक्त विद्यापीठातून कोणीही बीएला प्रवेश घेऊ शकतो. मी पाचवी पास आहे. मात्र मुक्त विद्यापीठातून मी ‘बीए’ला प्रवेश घेतला. त्यामुळे मी २००४ मध्ये मी ‘बीए प्रथम वर्ष’ असा उल्लेख केला. मात्र त्यानंतर आमदार झाल्याने पुढील शिक्षण घेऊ शकलो नाही. त्यामुळे २०१४ च्या प्रतिज्ञापत्रात मी पुन्हा पाचवी पासचा उल्लेख केला.’ असे लाेणीकरांनी स्पष्ट केले.

इराणीही वि‘स्मृती’त
चुकीची शैक्षणिक माहिती दिल्याबद्दल भाजपने केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रा.डॉ. रामशंकर कथेरिया यांच्यावर अद्याप कारवाई केलेली नाही. त्याच पद्धतीने लोणीकर यांच्यावरील कारवाई टाळली जात आहे.त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी सावंत यांनी केली.
बातम्या आणखी आहेत...