मुंबई- भारतीय जनता पक्षाविरोधात शरद पवार जे बोलत आहेत त्यांच्याच सूरात सूर मिसळून उद्धव ठाकरे व राज ठाकरे आमच्यावर टीका करीत आहेत असा आरोप भाजपचे वरिष्ठ नेते व केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज केला. शिवसेनेचे सध्या ताळतंत्र सुटले असून, उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधात एक चकार शब्द काढत नाहीत अशी टीका केली. शिवसेनेने
आपला लढा कोणाच्याविरोधात आहे ते ठरवावे असा सल्लाही जावडेकर यांनी सेनेला दिला.
भारतीय जनता पक्षावर राज्यातील प्रमुख चार पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे जहरी टीका करीत आहेत. या सर्वच पक्षांनी भाजपला व्हिलन ठरवले आहे. या पक्षातील नेते भाजपवर हल्लाबोल करताना, मोदी-शहापासून ते स्थानिक नेत्यांनाही लक्ष्य करीत आहेत. त्यामुळे सध्या सोशल मिडिया असो की माध्यमे असो भाजपविरोधी वातावरण तयार होत असल्याने भाजप अस्वस्थ आहे. असेच पुढील आठवडाभर वातावरण राहिले तर भाजपला मोठे नुकसान भोगावे लागेल अशी भीती स्थानिक भाजप नेते व पदाधिकारी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे भाजपने आज दुपारी मुंबईत एक पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त करीत भाजपवर टीका न करता काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका करण्याचा सल्ला दिला आहे.
जावडेकर म्हणाले, शिवसेना आपल्या प्रमुख विरोधकांना विसरली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीमुक्त महाराष्ट्र करण्याऐवजी ते भाजपवरच टीका करीत आहे. शरद पवार जे बोलत आहेत त्यांच्याच सूरात सूर उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे बंधू मिसळत आहेत. शिवसेनेचे संतुलन बिघडले त्यांचे ताळतंत्र सुटत चालले आहेत. शरद पवार पहिल्यापासून जे राजकारण करीत आले आहेत तेच राजकारण आता ते खेळत आहेत. सर्वच विरोधी पक्ष तुमच्यावर का हल्लाबोल करीत आहेत असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता जावडेकर म्हणाले, आम्ही बहुमतांसह ही निवडणूक जिंकणार आहोत. त्यामुळे सर्वच आम्हाला लक्ष्य करीत आहेत. मात्र आम्ही त्यांच्याकडे लक्ष्य देणार नाही. आम्ही जनतेला हवे असलेल्या मुद्यांवर बोलणार असून, त्यावरच निवडणूक लढवत आहोत. आम्ही सकारात्मक भाषणे, जाहीराती करून निवडणूक जिंकणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.