आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Minister Disappointed Over THe Drought Works Delaying

दुष्काळी भागामध्ये निधीअभावी कामे रखडल्याने मंत्र्यांची नाराजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मंत्रिमंडळाच्या उपसमितीने दुष्काळी भागांमध्ये नरेगा योजनेसाठी मागितलेला 150 कोटींचा निधी देण्यास वित्त विभागाने नकार दिल्याने त्याचे पडसाद बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले. रोहयोमंत्री नितीन राऊत, सार्वजनिक बांधकाममंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दुष्काळी भागामध्ये निधीअभावी कामे रखडली असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.


दुष्काळी भागांत पाणी, चा-यासाठी, रोहयो कामे होण्यासाठी म्हणून मदत व पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीची स्थापना करण्यात आली. या समितीने गेल्या आठवड्यात 150 कोटींचा प्रस्ताव अर्थ विभागाला पाठवला असता तो नामंजूर करण्यात आला. मुळात रोहयोअंतर्गत केवळ 288 कोटींचा निधी मिळाला असताना या तुटपुंज्या निधीचे वाटप करण्यावरून अनेकांमध्ये नाराजी असल्याचे राऊत यांनी सांगितले. रोहयोसाठी कुशल कामगारांना निधी दिला असता इतर क्षेत्रातील कुशल कामागारांनाही निधी द्यावा लागेल, असे कारण देत प्रस्ताव नाकारला होता. तसेच दुष्काळी तालुक्यांमध्ये 10 कोटींचा निधी देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण तो निधी सर्व तालुक्यांना मिळाला नाही, असे राऊत यांनी सांगितले. त्याला दुजोरा देत क्षीरसागर यांनी मराठवाड्याकडे दुर्लक्ष झाले असून बीडला केवळ दोन कोटी मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यामुळे निधी वाटपात असमानता असल्याचा आरोप त्यांनी केला.