आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Minister Raosaheb Danve Is New Maharashtra BJP Chief

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदी घोषणा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी जालन्याचे खासदार व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या नावाची घोषणा पक्षाध्यक्ष अमित शहांनी आज नवी दिल्लीत केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार, दानवे यांच्या नावाची अधिकृत घोषणा आज दिल्लीतून करण्यात आलेली आहे. दानवे लवकरच आपल्या अन्न-नागरी व ग्राहक संरक्षण राज्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील. येत्या चार-पाच दिवसात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.
मितभाषी असलेल्या दानवेंची निवड जातीय समीकरणे लक्षात घेऊन करण्यात आली आहे. सध्या मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने ब्राह्मण समाजाला संधी मिळाली आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी नेमताना मराठा समाज किंवा ओबीसी वर्गातून असावा असा पक्षात प्रवाह होता. त्यानुसार मागील काळात अनेक नावे चर्चेत होती. चंद्रकांतदादा पाटील यांच्यापासून आशिष शेलार, सुजितसिंह ठाकूर यांची नावे चर्चेत होती. मात्र, चंद्रकांतदादा पाटील यांनी मंत्रिमंडळात आपली वर्णी लावून घेतली. त्यामुळे पक्षाने पुन्हा एकदा जुन्या-जाणत्या नेत्याचा शोध घेत दानवेंच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ घातली आहे.
दानवे जालना लोकसभा मतदारसंघातून सलग चार वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. संयमी व शांत व्यक्तिमत्त्व असलेले दानवे गोपीनाथ मुंडे यांच्या गटाचे मानले जातात. मात्र, अलीकडच्या काळात त्यांनी नितीन गडकरी यांच्याशी जुळवून घेतले आहे. त्यामुळेच त्यांच्या नावाला पसंती मिळाली आहे. राज्य सरकारचा चार-पाच दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. त्यात 10-12 मंत्री शपथ घेत आहेत. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाचा छोटेखानी विस्तार होईल. यात दानवेंच्या जागी विनय सहस्त्रबुद्धे यांच्यासह शिवसेनेचे अनिल देसाई शपथ घेतील असे कळते आहे. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असलेले सहस्त्रबुद्धे यांना मुरली देवरांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर राज्यसभेत पाठवले जाणार आहे.
प्रदेशाध्यक्षपदी दानवे यांच्यासह आशिष शेलार व सुजितसिंह ठाकूर यांचे नाव चर्चेत होते. मुंबईपुरते मर्यादित असलेल्या शेलार यांची ग्रामीण महाराष्ट्रात फारशी ओळख नाही. त्याचा पक्षाला तोटा होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. शेलारांना आता राज्य सरकारमध्ये कॅबिनेट खाते मिळण्याची शक्यता आहे. तर, सुजितसिंह ठाकूरांच्या नावाला गडकरी गटाकडून विरोध झाला. त्यामुळे केंद्रात अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री असलेले दानवेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.