आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंत्री, सचिव ५ महिन्यांत प्यायले २४,६६८ लिटर मिनरल वॉटर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - उभा महाराष्ट्र दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या संकटामुळे घोटभर पाण्यासाठी त्रस्त असताना राज्य सरकारचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात मात्र मिनरल वॉटरचा अक्षरश: पूर वाहत असून मंत्री आणि सचिवांना त्याचे काहीच सोयरसुतक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मंत्रालयात मंत्री, सचिव आणि अन्य अधिकाऱ्यांनी गेल्या पाच महिन्यांत ४ लाख ६६ हजार रुपयांच्या २४,६८४ लिटर मिनरल वॉटरच्या बाटल्यांतील पाणी फस्त केल्याचे आरटीआयमुळे उघडकीस आले आहे.

बृहन्मुंबई महापालिकेकडून हेच पाणी घेतले असते तर त्यासाठी केवळ १७१ रुपये खर्च आला असता. महापालिका पाइपलाइनने १ हजार लिटर पाणीपुरवठा करण्यासाठी ४ रुपये ३२ पैसे आणि मलनिस्सारण शुल्कासह ६.९१ पैसे आकारते. मंत्रालयामध्ये गेल्या पाच महिन्यांत बिस्लेरीचे किती पाणी प्यायले गेले आणि त्यासाठी किती खर्च झाला, अशी माहिती अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत विचारली होती. त्यावर मंत्रालयातील कँटीनचे महाव्यवस्थापक आणि माहिती अधिकारी जे. एम. साळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर २०१४ ते एप्रिल २०१५ या काळात बिस्लेरीच्या ८३,६२८ बाटल्या खरेदी करण्यात आल्या होत्या. त्यांची किंमत ४,६६,०१९ रुपये इतकी आहे. त्यापैकी २५० मिलिच्या सर्वात जास्त ६८,९७६ बाटल्या पाणी प्यायले गेले. त्याची किंमत ३,६७,६४२ रुपये आहे, तर ९६,६८८ रुपये किमतीच्या ५०० मिलिच्या १४,४९६ बाटल्या आणि १६८९ रुपये किमतीच्या १ लिटरच्या १५६ बाटल्या बिस्लेरी फस्त करण्यात आल्या आहेत.

विशेष म्हणजे मंत्रालयात पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी सरकारने अॅक्वागार्ड बसवलेले आहेत, तरीही मंत्री आणि सचिव बिस्लेरीच्या पाण्याचाच आग्रह धरतात.
बाटल्या संख्या किंमत (रु.)
२५० मिलि ६८९७६ ३६७६४२
५०० मिलि १४४९६ ९६६८८
१ लिटर १५६ १६८९
बातम्या आणखी आहेत...