आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्र्यांना शेतकरी बोगस ठरवण्याचा हक्क नाही; खासदार पटोलेंंची चंद्रकांत पाटलांवर टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझे जुने मित्र आहेत. मित्र जेव्हा चुकतो तेव्हा त्याला बोलण्याचा अधिकार दुसऱ्या मित्राला असतोच. आपण तेच तर काम करत आहोत, असे स्पष्ट करत ‘राज्यातील शेतकऱ्यांना बोगस ठरवण्याचा हक्क महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना कुणी दिला,’ असा खडा सवाल भाजप खासदार नाना पटोले यांनी सरकारला केला. पटोले बुधवारी मंत्रालयात पत्रकारांशी बोलत होते.   

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोगस शेतकरी आढळल्याचे स्वत: नाकारले आहे. असे असताना महसूलमंत्री राज्यात दहा लाख शेतकरी बोगस असल्याचे विधान करतात ही बाब अतिशय गंभीर अाहे. शेतकरी नेता म्हणून चीड आणणारी आहे, असे पटोले यांनी सांगितले. फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीवर आपण नाराज आहोत, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीच मिळाली पाहिजे होती, अशी ठाम भूमिका घेत आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला. कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरताना सातबारासह बँका, आधार  आदी सर्व पुरावे द्यावे लागतात. सरकारने ठेवलेल्या निकषानुसार शेतकरी कर्जमाफीचे अर्ज भरत आहेत तरीसुद्धा मंत्री त्यांना बोगस ठरवतात. याविषयी आपण आजच मुख्यमंत्र्यांना विचारणा केली. शेतकरी बोगस असल्याचे आपल्या तरी  निदर्शनास आले नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सांगितले, असे पटोले यांनी सांगितले.       

कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज स्वीकारणारी यंत्रणा शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे आपण बोलतो त्यात चूक काही नाही. मी आणि मुख्यमंत्र्यांनी १९९९ मध्ये राज्याच्या राजकारणात प्रवेश केला. मुख्यमंत्री आपले मित्र आहेत. मित्र जर चुकत असेल तर सुधारण्यासाठी बोलण्याचा आपल्याला अधिकार आहे, अशी भूमिका पटोले यांनी मांडली.     
 
सरकार चुकल्यास बोलणार 
विकासाच्या दृष्टीने मागास असलेल्या ओडिशासारख्या राज्यात धानाला (भात) २ हजार ९९० रुपयांचा हमीभाव मिळतो. मात्र महाराष्ट्रात धानाला योग्य भाव मिळत नाही. एकेकाळी महाराष्ट्रातील योजनांमधून देशाला दिशा मिळायची. आता ती परिस्थिती राहिली नाही, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांचे सरकार चुकत असेल तिथे यापुढेही बोलतच राहणार, असा निर्धारही पटोले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.  विदर्भातील ओबीसी नेते असलेले नाना पटोले राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव करून खासदार बनले. राष्ट्रवादीचे पटेल सध्या भाजपचे लाडके आहेत. त्यामुळे मोदी सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर पटोले खार खाऊन असल्याचे सांगितले जाते.   
 
मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीसमोर दुबळे   
महाराष्ट्रातील प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडे योग्य पाठपुरावा पूर्वी होत नव्हता. त्यामुळे ते प्रकल्प रखडलेले होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर जराही सुधारणा झालेली नाही, असा दावाही पटोले यांनी या वेळी केला.
 
बातम्या आणखी आहेत...