आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ministers Will Have To Play A Role In Membership Drive, Says Amit Shah

एक लाख सदस्य नोंदणीचे प्रत्येक आमदाराला लक्ष्य, अमित शहांचे आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘महाराष्ट्रातील शेवटच्या माणसापर्यंत पक्ष पोहोचवण्यासाठी कामाला लागा’, असे आदेश भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांना दिले. राज्यात सुरू असलेल्या सदस्य नोंदणीसाठी नेत्यांनी स्वत:ला झोकून द्यावे, असे आवाहन करतानाच शहा यांनी प्रत्येक आमदाराला किमान एक लाख नवे सदस्य करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. तसेच राज्यातल्या बूथचे जाळे अधिक दाट करण्यावरही भर देण्यात येणार आहे.

भाजपने देशपातळीवर सुरू केलेल्या सदस्य नांेदणी अभियानाच्या राज्यातल्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी मुंबईत भाजपचे मंत्री आणि प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत शहा यांनी सदस्य नोंदणीबाबत काही सूचना नेत्यांना दिल्या. ‘शक्य त्या सर्व मार्गांनी पक्ष वाढवा, पक्ष शेवटच्या स्तरावरच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी प्रयत्न करा. कोणत्याही पक्षाचा महत्त्वाचा नेता पक्षात येण्यास इच्छुक असेल तर त्याला घ्या, मात्र तो नेता गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नको याची काळजी घ्या,’ असा सल्ला शहा यांनी दिला. देशातल्या इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक मोबाइल महाराष्ट्रात आहेत. या माध्यमातून पक्ष वाढवण्याची आपल्याला चांगली संधी असल्याचेही शहा म्हणाले.

मतांचा टक्का दुपटीने वाढला
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला एकूण ७२ लाख मते मिळाली होती. त्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत भाजपने आपल्या मतांची संख्या दुप्पट करत कोटी ४४ लाख एकूण मतांवर झेप घेतल्याचे अमित शहा यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे आता राज्यातल्या प्रत्येक आमदारानेही स्वत:ला सदस्य नोंदणीत झोकून देणे गरजेचे आहे. प्रत्येक आमदाराला किमान एक लाख सदस्य संख्येचे लक्ष्य निश्चित करण्याच्या सूचनाही त्यांनी राज्यातल्या नेतृत्वाला दिल्या. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी मुंबईत बैठक घेतली. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते उपस्थित हाेते.

राज्यात दीड कोटी सदस्य
केंद्रात राज्यात सत्ता मिळाली तरी पक्ष आणखी बळकट करण्यावर आमचा भर आहे. देशात भाजपचे दहा कोटी सदस्य बनवण्याचे लक्ष्य आहे. आतापर्यंत अडीच कोटी लोक पक्षाचे सदस्य बनले आहेत. महाराष्ट्रातून वीस लाख लोक सदस्य बनले आहेत. आगामी काळात सव्वा ते दीड कोटी लोक सदस्य बनलेले असतील, असा विश्वासही शहा यांनी बाेलून दाखवला.

मोदी सरकारने महागाई कमी केली
‘सत्तेवर येण्यापूर्वी भाजपने महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते. आज सहा महिन्यांनंतर महागाईचा दर शून्य टक्क्याच्या घरात आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून पेट्रोल आणि डिझेल दरात नऊ वेळा कपात करण्यात आली आहे. मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारकडून देशाच्या विकासासाठी धोरणात्मक पावले उचलण्यात येत आहेत. जन-धन योजनेला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, स्वच्छ अभियान राबवून सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे,’ असे शहा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

महापालिका निवडणुकांवर लक्ष
भाजपने सध्या हाती घेतलेले सदस्य नोंदणी अभियान आणि बूथ विस्तार योजना या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवताना शिवसेनेसोबत जायचे अथवा नाही याबाबतचा निर्णय त्या त्या वेळी घेतला जाईल, मात्र तोपर्यंत स्वबळाची तयारी करण्याची रणनीती भाजपने आखल्याचे स्पष्ट होते आहे.

बूथ यंत्रणेचे जाळे बळकट करणार
पक्षातल्या बूथ यंत्रणेचे जाळे दाट करण्यावर भाजप लक्ष देत आहे. शुक्रवारच्या बैठकीत शहा यांनी याबाबतही मार्गदर्शन केले. १२ जानेवारी ते २७ जानेवारी या कालावधीदरम्यान राज्यात बूथ विस्तार योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली. तसेच १० आणि ११ फेब्रुवारीला बूथ रचनेच्या विस्ताराचा आढावा घेतला जाणार आहे. निवडणुकीच्या काळात बूथ यंत्रणेचे असलेले महत्त्व लक्षात घेता अधिकाधिक युवकांना बूथ यंत्रणेच्या कामात सहभागी करून घेण्याच्या सूचनाही शहा यांनी दिल्या.