आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीला बेशुध्द होईपर्यंत मारहाण; शिवसेनेने उपस्थित केला पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपीने तारेने अल्पवयीन मुलीला मारले होते. - Divya Marathi
आरोपीने तारेने अल्पवयीन मुलीला मारले होते.
मुंबई- महिलांसाठी सुरक्षित शहर अशी ओळख असणाऱ्या मुंबईत मुलीसोबत खुलेआम छेडछाड करून तिला मारहाण करण्यात आल्याची घटना कुर्ला नेहरूनगर येथे घडली होती. या घटनेतील पीडित मुलगी हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याचा दाखला व जबाब कोर्टात सादर करण्यात पोलिसांनी दिरंगाई केली. याबाबत सखोल चौकशी करावी आणि या घटनेची क्लिप समाजाने वाहिन्यांवरून पाहिली. या घटनेबाबत जामीन देत असल्याचा निकाल कोर्टाने दिल्याने या मुलीची बाजू कोर्टात व्यवस्थित मांडण्यात न आल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रकरणी हायकोर्टात अपील करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांकडे केली आहे.

कुर्ला नेहरूनगर पोलिस स्टेशन हद्दीत एका अल्पवयीन मुलीला मारहाण व विनयभंग केल्याची घटना 17 ऑक्टोबर 2017 रोजी घडली होती. अनेक गोष्टी संशयास्पद असल्याचे निदर्शनास आल्यानंतर नेहरू नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कोपर्डे यांच्याकडून या प्रकरणाचा तपास काढून घेऊन टिळकनगर येथील महिला पोलिस निरीक्षक मनीषा शिर्के यांच्याकडे सोपविण्यात आला. मात्र सदर केस हाताळत असताना या कुटुंबाला पोलिस यंत्रणेकडून वारंवार चुकीची माहिती देण्यात आल्याचे दिसून आले आहे.  
 
या मुलीचा 164 अन्वये जबाब घेण्यात आला होता. या घटनेत आरोपीवर पोक्सो कायदा लागू करण्यात आलेला आहे. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सर्वत्र प्रसिद्ध झाले आहे. मात्र याची दखल या केसमध्ये न घेता 31 ऑक्टोबर 2017 रोजी सेक्शन कोर्ट - 40 येथे आरोपीस हजर केले असता त्याला जामीन मंजूर करण्यात आला.  

आ. डॉ. गोऱ्हे यांनी पोलिसांकडे याबाबत विचारणा केली असता आम्ही योग्य पद्धतीने बाजू मांडली असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या केसचे काम पाहणाऱ्या सरकारी वकिलांनी काय भूमिका मांडली याबाबत पोलिसांना स्पष्ट सांगता आलेले नाही. आरोपीला त्याच्या राहत्या भागात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मात्र आरोपी व पीडित मुलगी एकाच इमारतीमध्ये राहत असल्याने हे कसे शक्य होणार याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. पीडित मुलगी आणि तिच्या नातेवाईकांना आरोपीचे नातेवाईक वारंवार त्रास देत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आणून देऊनसुद्धा त्यांच्यावर कारवाई का होत नाही, याची सखोल चौकशी करण्यात यावी. आरोपीस मिळालेल्या जामिनाच्या विरोधात उच्चस्तरीय कोर्टात अपील करून जामीन रद्द करण्याची मागणी करावी, अशी मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे.
 
या मुलीला सध्या एका रुग्णालयात दाखल केले असून तिथे तिला कोणतेही पोलिस संरक्षण देण्यात आलेले नाही. याकडे आ. डॉ. गोऱ्हे यांनी पोलिस आयुक्तांचे लक्ष वेधले आहे. लोकप्रतिनिधी व मुलीच्या कुटुंबीयांना वेगवेगळी माहिती पोलिसांनी का दिली, या केसची आवश्यक कागदपत्रे कोर्टात उशिरा सादर का करण्यात आली ?, मुलीच्या कुटुंबीयांना अद्यापही धमक्या येत आहेत, यावर कोणती कार्यवाही करणार अशी विचारणा शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती व व्हिडिओ
बातम्या आणखी आहेत...