मुंबई - मीरा-भाईंदर महानगर पालिकेने एक तुघलकी निर्णय घेतला आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजप विरोधात शिवसेना असे चित्र पाहायला मिळत आहे. मीरा-भाईंदर महापालिकेने जैन पर्युषम पर्वानिमीत्त आठ दिवस मांस-मटण विक्रीवर बंदी घातली आहे. याला स्थानिक मांस विक्रेते आणि शिवसेना नगरसेवकांनी कडाडून विरोध केला आहे. सत्ता बदलल्यावरच सणांची आठवण कशी झाली असा सवाल शिवसेना नगरसेवकांनी महापौरांना विचारला आहे.
जैन समुदायाचे पर्युषण पर्व 11 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. त्यामुळे पुढील आठ दिवस मांस-मटण विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. हा प्रस्ताव भाजप नगरसेवक दिनेश जैन यांनी मांडला होता. त्याला शिवसेनेने विरोध केला होता मात्र फक्त दोन मतांनी भाजपची सरशी झाली आणि शहरात सरसकट मटणबंदी करण्यात आली.
मीरा-भाईंदरमध्ये किती जैन
मीरा-भाईंदर महापालिकेची लोकसंख्या 8.5 लाख आहे. त्यात जवळपास सव्वालाक जैन समुदायातील लोक आहेत. त्यामुळे सव्वालाख लोकांसाठी 7 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येला वेठीस धरणे योग्य नसल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. पालिकेच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी सोमवारी महापौरांच्या दालनात मासे विक्रेत्यांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी आंदोलक मासे घेऊन दालनात शिरले होते.