आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीरा-भाईंदरमध्ये फुलले कमळ; शिवसेनेचेही नगरसेवक वाढले, 95 पैकी 61 जागांवर भाजप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यभरात भाजपची ताकद सतत वाढत असून पालघरनंतर आता मीरा-भाईंदर महानगरपालिकेवरही भाजपचे कमळ फुलले अाहे. एकूण ९५ पैकी ६१ जागा मिळवून भाजपने एकहाती सत्ता प्राप्त केली आहे. शिवसेनेला सत्ता मिळाली नसली तरी गेल्या वेळपेक्षा या पक्षाचे सात नगरसेवक वाढले अाहेत.
 
ज्या महानगरपालिकेवर गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती त्यांना या वेळी मात्र भोपळाही फोडता आलेला नाही. राज ठाकरे यांच्या मनसे आणि बहुजन विकास आघाडीलाही एकही जागा मिळाली नाही. एकूणच मीरा-भाईंदरच्या जनतेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनांवर विश्वास टाकल्याचेच दिसून येत आहे.   
 
विधानसभा निवडणुकीपासून सत्तेत एकत्र असूनही एकमेकांचे शत्रू झालेल्या भाजप आणि शिवसेनेने मीरा-भाईंदरची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. यात भाजपने शिवसेनेला चांगलीच धोबीपछाड दिली. खरे तर या निवडणुकीपूर्वी मीरा-भाईंदरच्या निवडणुकीची जबाबदारी असलेल्या शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने निवडणुकीपूर्वी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले होते की मीरा-भाईंदरमध्ये आमची तशी ताकद नाही. आम्हाला उमेदवार आयात करावे लागत आहेत. त्यामुळे सत्ता येण्याची शक्यता कमी आहे, परंतु आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत. आमच्या जागा वाढल्या तर ते आमच्यासाठी महत्त्वाचे असेल, असेही या नेत्याने सांगितले होते. त्याचाच प्रत्यय निकालात दिसून आला. गेल्या वेळी युतीत जागा लढून शिवसेनेचे १५ नगरसेवक निवडून अाले हाेते, या वेळी स्वबळावर लढल्यामुळे ही संख्या २२ वर गेली. त्यामुळे शिवसेनेला आता विरोधी पक्षाची भूमिका बजावावी लागणार आहे.   
 
भाजपने गेल्या वेळी २९ जागा जिंकल्या होत्या. त्यात दुपटीने वाढ होऊन ६१ जागांवर विजय प्राप्त करीत एकहाती सत्ता मिळवली आहे. पालिकेत सत्तास्थापनेसाठी ४८ जागांची गरज अाहे. मात्र, भाजपने पूर्ण निकाल जाहीर होण्यापूर्वीच हा आकडा ओलांडला होता. काँग्रेसला दहा जागांपर्यंत मजल मारता आली. उर्वरित एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला. तर मनसे आणि बहुजन विकास आघाडीला भोपळाही फोडता आला नाही.

भाजप- शिवसेनेचे ‘टि्वटर’ युद्ध  
- भाजप अामदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका करणारे ट्विट केले. ‘मुंबईत दमछाक, पालघर-कल्याण-डोंबिवलीत अडले आणि पनवेलमध्ये भोपळा मिळाला. एमएमआरमध्ये पाचव्यांदा मतदारांनी लबाडाघरचे आमंत्रण नाकारले आणि काहींच्या ताकदीचा असली चेहरा उघड केला,’ अशी टीका त्यांनी शिवसेनेचे नाव न घेता केली.   
- शिवसेना नेते व परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी ‘पानिपताच्या युद्धानंतर मराठे हरले होते, परंतु नंतर ते उठले आणि देश पादाक्रांत केला’ असे उत्तर आशिष शेलार यांच्या ट्विटला दिले.   
- भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करीत, ‘आता तरी बांद्रा सुप्रीमो वास्तविकता स्वीकारणार का आणि पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांचा आता तरी मान राखणार का?’ असा प्रश्न केला.

पुढील स्लाइडवर वाचा... हिंदी भाषिकांची मते निर्णायक, भाजपचे पारडे जड
बातम्या आणखी आहेत...