मुंबई - है कुछ ऐसी ही बात जो चुप हूं
वरना क्या बात कर नहीं आती?
क्यों न चीखूं की याद करते हैं
मेरी आवाज़ गर नहीं आती?
असे जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणार्या रचनांची निर्मिती करणारे "मिर्झा गालिब' यांचे चरित्र ख्यातनाम कवी गुलजार यांनी शब्दबद्ध केले. हिंदीत मांडलेले हे चरित्र प्रसिद्ध लेखक अंबरीश मिश्र यांनी मराठीतून अनुवादित केले आहे. अरुण शेवते यांच्या ऋतुरंग प्रकाशनातर्फे प्रकाशित केलेल्या या चरित्राचा प्रकाशन सोहळा औरंगाबादेत कवी गुलजार यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ लेखक यशवंतराव गडाख यांच्या हस्ते होणार आहे.
शनिवारी दुपारी ४ वाजता एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात हा सोहळा रंगणार असून या वेळी गुलजार यांच्याशी संवाद साधत अंबरीश मिश्र गालिब यांचा लेखन-जीवनप्रवास आणि गुलजार यांचे चरित्र लिहितानाचे अनुभव उलगडणार आहेत.
मालिका ते चरित्र : साधारणपणे २५ वर्षांपूर्वी गुलजार यांनी गालिब या दूरदर्शनवरील मालिकेद्वारे गालिब यांचे लेखन, जीवन उलगडले होते. त्यात ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा यांनी गालिब यांची भूमिका साकारली होती. अनेक साहित्यप्रेमींसाठी, वाचकांसाठी गालिब नेहमीच पथदर्शक, जीवनदृष्टी देणारे ठरले आहेत. गुलजार यांनी हाच धागा वेचत मालिकेतून गालिब उलगडले होते. आता चरित्रातून त्यांनी गालिब यांना रेखाटले आहे. मराठीत मिश्र यांनी या पुस्तकाचा केलेला अनुवाद त्यामुळे मराठी वाचकांसाठी अत्यंत मोलाचा ठरणार आहे.
आनंदाची बाब
ऋतुरंग प्रकाशनातर्फे मी या आधी यशवंतराव गडाख यांसारख्या लेखकांची पुस्तके प्रकाशित केली. खरे तर माझ्या प्रकाशनाचा हा पायाभरणीचा काळ आहे. त्यामुळे अशा काळात गुलजार यांचे पुस्तक करायला मिळणे ही माझ्यासाठी खराेखर आनंदाची बाब आहे. : अरुण शेवते, प्रकाशक, ऋतुरंग प्रकाशन
मी तिसरा नोकर: गुलजार
चरित्रामध्ये गुलजार यांनी गालिब यांचे व्यक्तिगत आयुष्य उलगडताना गालिब यांच्या दोन नो करांचाही उल्लेख केला आहे. मात्र, तो करताना गुलजार म्हणतात, ‘गालिब यांचे जसे दोन नोकर होते तसाच मी त्यांचा तिसरा नाेकर आहे.’ चरित्राद्वारे गालिब यांना गुलजार यांनी अशी आदरांजलीच वाहिली आहे.
दुहेरी आनंद
‘मिर्झा गालिब’ या चरित्राचा मराठीमध्ये अनुवाद करताना मी गुलजार यांच्याशी वेळोवेळी संवाद साधला. अलीकडेच मी त्यांच्या ‘ड्योढी’ या कथासंग्रहाचाही मराठी अनुवाद केला होता. त्यामुळे मला पुन्हा एक दुहेरी आनंद मिळाला.
अंबरीश मिश्र, लेखक