आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समूह वाचवण्यासाठी‘टाटा’त सुशासनासाठी मिस्त्रींचा प्रयत्न सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टाटा समूहात सुशासनाची आवश्यकता असून त्यासाठी सायरस मिस्त्री प्रयत्न करणार असल्याचे निकटवर्तीय सूत्रांनी म्हटले आहे. मिस्त्रींचे भवितव्य ठरवणाऱ्या विविध कंपन्यांच्या विशेष सर्वसाधारण सभा येत्या आठवड्यापासून सुरू होत आहेत. त्या दृष्टीने मिस्त्रींनी भागधारक आणि हितचिंतकांच्या भेटीगाठी सुरू केल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली.

टाटा सन्स संचालक अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांची २४ ऑक्टोबरला हकालपट्टी करण्यात आली. टाटा सन्सचे काही संचालक आणि ट्रस्टचे काही विश्वस्त यांनी रतन टाटा यांच्या मनात चुकीची माहिती देऊन मिस्त्रींची प्रतिमा मलिन केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी म्हटले आहे. टाटा समूहातील सुशासनाचा अभाव आणि एकांगी निर्णयाचा फटका कंपन्यांच्या कामगिरीला बसला असल्याचे मिस्त्री गटाने म्हटले आहे.

मिस्त्रींचे रतन टाटा यांच्याशी संबंध बिघडण्यास त्यांच्या भोवताली असणाऱ्या काही निवडक लोकांची भूमिका कारणीभूत असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात मिस्त्रींनी टाटा समूहाच्या विस्तारासाठी प्रामाणिक प्रयत्न केले, मात्र दुर्दैवाने त्यांचा प्रामाणिकपणा रतन टाटा आणि त्यांच्या निकटवर्तीयांसमोर सिद्ध होऊ शकला नाही, अशी खंत मिस्त्री गटाकडून व्यक्त करण्यात आली. मिस्त्री यांनी समूहाच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

समूहाचा आवाका आणि योगदान पाहता आता भागधारकांनी सुशासन आणण्यासाठी पुढाकार घेण्याची वेळ आली आहे. टाटा समूह वाचवण्यासाठी लोकचळवळ सुरू होण्याची आवश्यकता मिस्त्री गटाने व्यक्त केली आहे.
बातम्या आणखी आहेत...