आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mla Attack Api At Vidhanbhavan, Case On Thakur, Kadam & Other 12 Mla

एपीआयला विधानभवनात मारहाण : क्षितीज ठाकूर, राम कदम यांच्यासह इतर 12 आमदारांवर गुन्हे दाखल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करत आमदार क्षितिज ठाकूर यांच्यासह मनसेचे आमदार राम कदम, भाजपचे जयकुमार रावल यांनी मंगळवारी विधानभवनाच्या आवारातच सहायक पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याची घटना घडली.

यावर विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली असून, राज्यातील जनता, पोलिस व आमदारांचीही माफी मागितली. दरम्यान, ठाकूर व कदम यांच्यासह 12 जणांवर रात्री उशिरा मरीन ड्राइव्ह पोलिसांत गुन्हे दाखल झाले आहेत.

गदारोळ, कामकाज पाच वेळा तहकूब : विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी सूर्यवंशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवले. त्यांच्या निलंबनाची मागणी करत आमदारांनी गदारोळ केल्याने कामकाज 20 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. सूर्यवंशी यांना मारहाण झाल्यानंतर अध्र्या तासासाठी पुन्हा कामकाज तहकूब झाले. दोन्ही बाजूंची चौकशी करण्याची घोषणा विधानसभा अध्यक्षांनी केल्यानंतर पुन्हा गोंधळ झाला आणि अर्धा तास कामकाज तहकूब झाले. त्यानंतर सव्वा तासासाठी आणि नंतरही दोन तासांसाठी कामकाज तहकूब करण्यात आले. मंत्र्यांना नसेल, पण आमदारांना पोलिसांची झळ पोहोचते. मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा सभागृह चालू दिले जाणार नाही, असे काँग्रेस आमदार सुनील केदार म्हणाले. त्यावर दोन्ही बाजू तपासल्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असे संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले. यामुळे नाराज आमदार केदार, रमेश बागवे, मधू चव्हाण सभागृहातून निघून गेले.

बैठकांचे सत्र, आमदारांचा इशारा : या प्रकरणी निर्णय घेण्यासाठी विधानसभा अध्यक्ष वळसे पाटील, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील, पोलिस महासंचालक संजीव दयाळ, आयुक्त सत्यपाल सिंग आदींची विधानभवनातील दालनात बैठक झाली. या वेळी मारहाणीचे चित्रण तपासण्यात आले. सर्वपक्षीय आमदारांनी सूर्यवंशी यांच्यावर कारवाईची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. सूर्यवंशी यांच्यासोबतच्या वादाचे चित्रण असल्याचेही ठाकूर यांनी सांगितले. अधिकार्‍याचे निलंबन न झाल्यास बुधवारी अर्थसंकल्पाला आमदार हजर राहणार नाहीत, असा इशारा आमदारांनी दिल्याचे काँग्रेस सदस्यांनी सांगितले.

सभागृहाबाहेरही पडसाद : विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनीही आपले आमदार यात सामील असतील तर कारवाई करू, असे म्हटले आहे. घटना चुकीची असून, संबंधित आमदारांवर सरकारची कारवाई मान्य असेल, असे मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर म्हणाले.

वसई विरारचे आमदार ठाकूर यांनी सहायक पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी अवमान केल्याचे सांगत हक्कभंगाची तक्रार विधानसभेत दाखल केली.

- सूर्यवंशी यांनी तीन दिवसांपूर्वी वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या टोलनाक्यावर गाडी अडवली. वेगात गाडी चालवण्यासह आणखी एक गुन्हा नोंदवला. दुसरा गुन्हा विचारला तेव्हा कॉन्स्टेबलला विचार, असे सूर्यवंशी यांनी दरडावले.

- 'आमदार असशील तर आपल्या घरचा,' असे उर्मट उत्तरही सूर्यवंशी यांनी दिले, असे ठाकूर म्हणाले. हक्कभंगासाठी 26 आमदारांच्या सह्या घेतल्याचेही ठाकूर म्हणाले.

- सूर्यवंशी यांना हक्कभंग दाखल करत असल्याचे सांगितले. त्यावर त्यांनी काय करायचे ते करा, असे उद्दाम उत्तर दिले. सूर्यवंशी प्रेक्षक गॅलरीत बसून काही हातवारे करत असल्याचे आमदारांच्या निदर्शनास आले. त्यावरून संतापलेल्या आमदारांनी त्यांना बाहेर खेचून मारहाण केली.

दुर्दैवी घटना; दोषींवर कारवाई करू : मुख्यमंत्री

- शरद पवारांकडूनही निषेध; विधिमंडळाची प्रतिष्ठा जपावी

- आमदारांविरुद्ध दाखल गुन्ह्याचा तपास मुंबई क्राइम ब्रॅँचकडे

- जखमी अधिकारी सूर्यवंशी सेंट जॉर्ज रुग्णालयात