आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार बोर्डीकर, सावंत यांना काँग्रेसची नोटीस!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - काँग्रेसमधील बंडाळीने डोके वर काढल्यामुळे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे संतापले असून त्यांनी पक्षविरोधी कारस्थाने करणार्‍या आमदार विजय सावंत तसेच रामप्रसाद बोर्डीकर यांना नोटीस बजावली आहे. नसीम खान व कृपाशंकर सिंहांसह पक्षविरोधी भूमिका घेणार्‍यांवर कठोर कारवाईचा इशारा काँग्रेसचे ठाकरे यांनी दिला आहे.

गांधी भवन येथे पत्रकार परिषद घेऊन माणिकरावांनी पक्षविरोधी काम करणार्‍यांविरोधात काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘पक्षाची भूमिका व आघाडीचा धर्म आमदार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाळायला हवा. पक्ष आदेश देईल त्या उमदेवाराच्या प्रचारात सहभागी होणे, हे त्यांचे कर्तव्यच आहे. मात्र, तसे होत नसल्यास गंभीर दखल घेतली जाणार आहे. आधी नोटीस पाठवली जाईल आणि नंतर निलंबनाचीही कारवाई होऊ शकते’.

आमदार विजय सावंत यांनी बुधवारी कणकवलीत पत्रकार परिषदत उद्योगमंत्री नारायण राणेंवर जोरदार टीका केली. निवडणुका आल्या की राणेंना काँग्रेस व आघाडीतील पक्ष आठवतात. ते आम्हाला मानणार नसतील तर त्यांनाही आम्ही किंमत देणार नाही, असे सांगत सावंत यांनी बंडाचा झेंडा उभारला. कणकवली परिसरात साखर कारखाना उभारणार्‍या सावंत यांना राणेंनी खूप त्रास दिला होता. या त्रासाने वैतागलेल्या सावंत यांनी निवडणुकीत डॉ.नीलेश राणेंच्या प्रचारात न उतरण्याचा निर्णय घेतला आहे. परभणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमदेवार विजय भांबळे यांच्याविरोधात काँग्रेसचे आमदार बोर्डीकर काम करत आहेत. राष्ट्रवादीकडून याविषयी माणिकरावांकडे तक्रार केली. नोटीस देऊन बोर्डीकरांना इशारा देण्यात आला आहे. मात्र, तरीही बोर्डीकरांनी आपली कारस्थाने थांबवलेली नाहीत.

वस्त्रोद्योग मंत्री नसीम खान तसेच आमदार कृपाशंकर सिंह उत्तर मुंबईत काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांच्या प्रचारात सहभागी होताना दिसत नाहीत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी मध्यस्ती करून गुरुवारी प्रिया तसेच नसीम व कृपाशंकर यांची भेट घडवून आणली होती. काही आक्षेपार्ह आढळल्यास काँग्रेसने या दोन्ही नेत्यांविरोधात पाऊल उचलण्याचे संकेत दिले आहेत.

विदर्भात आघाडीला शंभर टक्के फायदा
विदर्भात सरासरी साठ टक्के मतदानाचा फायदा काँग्रेस आघाडीला शंभर टक्के होणार असल्याचे माणिकराव ठाकरे म्हणाले. ते म्हणाले, विदर्भातील मोठ्या संख्येने झालेल्या मतदानाचा फायदा काँग्रेसला होणार असून 10 पैकी 7 जागा काँग्रेसला, तर 3 जागा राष्ट्रवादीला मिळतील. विदर्भात कुठलीही लाट नव्हती. काँग्रेसला मानणारा खूप मोठा वर्ग आजही या भागात असून तो या वेळी काँग्रेस सोडून इतर कोणालाही मतदान करणार नाही.