आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदारकी सोडा, मग राष्ट्रवादीत जा; भाजपने धनंजय मुंडेंना ठणकावले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भाजपचे वरिष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे बंधू पंडितअण्णा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असताना त्यांचे पुत्र धनंजय मुंडे त्याच रस्त्याने जायला विलंब का लावत आहेत, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी केला. धनंजय यांनीही खुशाल राष्ट्रवादीत जावे, पण भाजपची आमदारकी सोडून मगच जावे, असेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
पत्रकारांशी बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, पंडितअण्णांशी मी आयुष्यात कधीही बोललेलो नाही. भाजप ही इतर पक्षांसाठी ‘प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’ नसून, विचारधारेवर चालणारा हा पक्ष आहे. पक्षाची बाजू सावरून धरण्यासाठी कोणाच्या येण्याजाण्याने पक्षाला फरक पडत नाही. पक्षात लोक येतात आणि जातातही; परंतु पक्षाची वाटचाल मात्र सुरूच राहते, असे स्पष्टीकरण मुनगंटीवार यांनी दिले.
प्रकाश मेहता व प्रकाश शेंडगे यांच्याशी पक्षाने चर्चा केली आहे. मेहता पाच वर्षांपासून उत्तमपणे काम करत आहेत, असे सांगून जागावाटपाबाबत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वगैरे असे काहीच नाही, असे मुनगंटीवार म्हणाले. आगामी निवडणुकांत कोणत्याही नेत्याच्या नातेवाइकांना तिकीट मिळणार नाही या भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांच्या आदेशाचा त्यांनी पुनरुच्चार केला. काही नेत्यांच्या खासगी सचिवांना तिकीट मिळण्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला. दरम्यान, अभिनेत्री किरण खेर यांच्या हस्ते भाजपच्या मीडिया सेंटरचे उद्घाटन झाले. या वेळी आपण पैसे घेऊन कोणाचा प्रचार करत नाही. काँग्रेसनेही आपल्याला प्रचारासाठी विचारणा केली होती, असे खेर म्हणाल्या.
प्रज्ञांवरील आरोपांमागे राष्ट्रवादीची फूस - गोपीनाथरावांच्या पत्नी प्रज्ञा यांच्यावर पंडितअण्णांनी केलेल्या घर फोडल्याच्या आरोपाचा मुनगंटीवार यांनी निषेध केला. राष्ट्रवादीच्या नेत्यांची यामागे फूस होती. राष्ट्रवादीचे नेते घर फोडतात. राजकारणाशी संबंधही नाही त्यांच्याविरुद्ध बोलण्यास भाग पाडतात. हे योग्य नाही, असे मुनगंटीवार म्हणाले.
कारवाई पक्षश्रेष्ठींकडे - धनंजय मुंडे यांच्यावरील कारवाईबाबत पक्षाच्या शिस्तभंग समितीचा अहवाल अद्याप आलेला नाही. तो आल्यानंतर केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवला जाईल व तेच निर्णय घेतील. - सुधीर मुनगंटीवार, प्रदेशाध्यक्ष, भाजप
आत्ताच बोलायचे नाही - परळी नगरपालिका निवडणुकीनंतर भाजपकडून चौकशीसाठी मला कसल्याही प्रकारचे साधे पत्रही आलेले नाही. त्यामुळे कोणत्याही नेत्याच्या वक्तव्यासंदर्भात मला आत्ताच काहीही बोलायचे नाही. - धनंजय मुंडे, आमदार, विधान परिषद.
20 तारखेनंतरच बोलेन - भारतीय जनता पक्ष सोडून जाणा-यांवर वीस तारखेनंतरच प्रतिक्रिया देईन. तोपर्यंत काहीही मत व्यक्त करणार नाही. - गोपीनाथ मुंडे, खासदार
बाजार समितीतही ‘धनंजय’च!, परळीत सभापतिपदी पंडितराव
दिल्ली सोडून मुंडे गल्लीत दाखल!
घराणेशाहीत गैर ते काय? गोपीनाथ मुंडे यांचा बेधडक सवाल!