आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांना अजितदादा ‘बाटगे’ म्हणतील का?; आमदार बोंडेंचे आव्हान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- “शरद पवार, राधाकृष्ण विखे-पाटील, भास्कर जाधव आदी सर्वांना अजित पवार ‘बाटगे’ म्हणणार का, हे त्यांनी मला सांगावे. तसे असेल तर मग मी त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेणार नाही,” असे आव्हान भाजप आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी मंगळवारी दिले. राजकीय टिप्पणी कशाला करता. मेरिटवर बोला, असे आव्हान डॉ. बोंडे यांनी दिले. त्यावर पवार निरुत्तर झाल्याचे चित्र विधानसभेत पाहण्यास मिळाले. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विधेयकावरील चर्चा सुरू असताना हा प्रसंग घडला. बाजार समित्यांमधील संचालकांच्या निवडीसाठी सर्व शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देणारी सुधारणा या विधेयकाअंतर्गत सरकार करू इच्छित आहे. या संदर्भातला अध्यादेशही सरकारने काढला आहे. या विधेयकाच्या विरोधात भाषणादरम्यान अजित पवार यांची जीभ घसरली. पवारांनी डॉ. बोंडे यांचे नाव घेऊन त्यांना ‘बाटगा’ असे म्हटले. त्याला डॉ. बोंडे यांनी प्रत्युत्तर दिले.  

“आधी मी शिवसेनेचा आमदार होतो. नंतर अपक्ष आमदार झालो. त्यावेळी मी काँग्रेसला पाठिंबा दिला. आता भाजपसोबत आहे म्हणून अजित पवारांनी मला तो शब्द वापरला, परंतु माझा त्यांना प्रश्न आहे की,  विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील १९९५ मध्ये भाजप-सेनेसोबत होते. पुलोद सरकारच्या काळात शरद पवार काँग्रेसमधून जनसंघाबरोबर राहिले. पुन्हा ते काँग्रेसमध्ये गेले. भास्करराव जाधव शिवसेनेत होते. आता राष्ट्रवादीत आहेत. अशी आणखी उदाहरणे देता येतील. या सगळ्या लोकांनाही अजितदादा बाटगे म्हणणार का,’ असा सवाल बोंडे यांनी उपस्थित केला. 

बोंडेंच्या या वक्तव्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी आक्षेप घेतला. त्यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन डॉ. बोंडे यांच्या मदतीला धावले. “अजितदादा ज्येष्ठ नेते आहेत. ते विद्यमान सदस्याला उद्देशून बाटगा म्हणतात. तेव्हा त्यांनी ते शांतपणे ऐकून घेतले. आता त्यांचे उत्तरही तुम्हाला ऐकून घ्यावे लागेल. तुम्ही काहीही बोलावे आणि समोरच्यांनी ते ऐकून घ्यावे, असे चालणार नाही,” असे महाजन यांनी सुनावले. तालिका अध्यक्षांनीही या वेळी डॉ. बोंडे यांना संरक्षण दिले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या सदस्यांना शांत बसावे लागले.
बातम्या आणखी आहेत...