आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार-आमदारांच्या ‘पीएं’ना नगरसेवक होण्याचे वेध !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून आपणही निवडणूक लढवावी, असे वेध आता खासदार-आमदारांच्या स्वीय सहायकांना (पीए) लागले आहेत. 16 फेब्रुवारी रोजी होणाºया मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक असलेल्यांमध्ये प्रमुख राजकीय पक्षांच्या खासदार-आमदारांच्या ‘पीए’चा समावेश आहे.
जवळपास सर्वच पक्षांच्या लोकप्रतिनिधींचे पीए तिकीट मागण्यात आघाडीवर आहेत. भाजपचे प्रदेश अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांचे पीए अमोल जाधव यांनी गिरगावमधून तिकीट मागितले आहे. मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांचे पीए विजय सिंग यांची मालाडमधून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांचे पीए महेश मलिक यांना गोरेगावचा नगरसेवक होण्याचे वेध लागले आहेत. काँग्रेसचे खासदार संजय निरुपम यांचे स्वीय सहायक जॉर्ज अब्राहम, भाजपचे लोकसभेतील उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे यांचे सचिव अमित साटम यांना जुहूमधून तिकीट हवे आहे. भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांचे सहायक अनिल सिंग, किरीट सोमय्या यांचे पीए दीपक दळवी आणि आदेश बांदेकर यांचे सहायक विक्रांत मांजरेकर हेदेखील तिकीट मिळवण्यासाठी धडपड करत आहेत.

नेते म्हणतात... नेटवर्क मजबूत होईल
या बदलावर भाष्य करताना ज्येष्ठ काँग्रेस नेते म्हणाले की, सहायकांना उमेदवारी मिळाल्यास तळागाळात पक्षाचे नेटवर्क मजबूत होईल. तसेच निष्ठावंत आणि आर्थिकदृष्ट्या सशक्त कार्यकर्त्यांची फळी निर्माण होईल. राजकीय निरीक्षकांच्या म्हणण्यानुसार, आमदार-खासदारांच्या पीएंनी निवडणूक लढवण्याचा ट्रेंड काही नवीन नाही. परंतु त्यात काही वर्षांपासून वाढ झाल्याचे चित्र आहे. केवळ मुंबईतच नव्हे तर राज्यातील इतर महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकाही लढवण्याची इच्छा अनेक नेत्यांच्या स्वीय सहायकांना असल्याचे दिसून आले आहे. साहेबांसोबतच्या जनसंपर्काचा आपल्याला लाभ होईल, असा दावाही त्यांच्याकडून केला जात आहे.