आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभेच्या इतिहासातील दुर्दैवी घटना; दोषींवर उद्या कारवाई होणार - मुख्यमंत्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्ट्राच्या विधानभवन परिसरात काही आमदारांनी एका पोलिस अधिकार्‍याला मंगळवारी मारहाणीची घटना घडली आहे. विधानसभेच्या इतिहासात याआधी अशी दुर्दैवी घटना घडलेली नाही. त्याचा राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. पोलिस अधिकार्‍याला झालेल्या घटनेची चौकशी सुरू असून दोषींवर उद्या कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

एपीआय सचिन सूर्यवंशी यांना काही आमदारांनी बेदम मारहाण केली आहे. पोलिस अधिकार्‍याला मारहाण प्रकरणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला गृहमंत्री आर.आर.पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहराज्यमंत्री सतेज पाटील उपस्थित होते. या घटनेचा सर्वस्थरातून निषेध व्यक्त होत आहे.

विधिमंडळाच्या गॅलरीत पोलिस निरीक्षकला आमदारांनी केलेल्या मारहाण प्रकरणी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील जनतेसह पोलिसांची माफी मागितली आहे. राज्यातील जनतेची दिलगिरी व्यक्त करताना त्यांनी, मारहाण करणा-या आमदारांच्या निलंबनासाठी वेळ हवा असल्याचेही सांगितले आहे.

वरळी वाहतूक पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना आमदारांनी बेदम मारहाण केली आहे. नालासोपार्‍याचे बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यासोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राम कदम, औरंगाबाद मध्यचे शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल भाजपचे आमदार जयकुमार रावल आणि शिवसेनेचे आणखी एक आमदार राजन साळवी यांनी सूर्यवंशी यांना बेदम मारहाण केली आहे.

पोलिस निरीक्षक सूर्यवंशी यांनी वांद्रे वरळी सी-लिंकवर आमदार क्षितीज ठाकूर यांची गाडी अडवून त्यांची चौकशी केली होती. आमदार ठाकूर यांची गाडी ११० च्या वेगाने जात असल्यामुळे त्यांना सूर्यवंशी यांनी दंड ठोठावला होता. त्यामुळे दुखावलेल्या आमदार ठाकूर यांनी विधानसभेत सूर्यवंशी यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला होता. त्यावेळी सूर्यवंशी प्रेक्षक गॅलरीत उपस्थित होते. याची माहिती मिळाल्यानंतर काही आमदारांनी प्रेक्षक गॅलरीकडे धाव घेतली आणि त्यांना बाहेर बोलावून त्यांना लाथा-बुक्यांनी मारहाण करण्यात आली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सूर्यवंशी यांना अमानूष मारहाण करण्यात आली आहे. त्यांच्या गुप्तांगावरही मारहाण करण्यात आली. त्यांना जबर मारहाण झाली असून ते तिथेच बेशुद्ध पडलेले होते. स्ट्रेचरवरून त्यांना विधिमंडळातून बाहेर नेण्यात आले. जखमी सूर्यवंशी यांना उपचारासाठी सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

ज्या विधिमंडळात कायदे केले जातात, त्याच ठिकाणी कायद्याच्या रक्षकावर अमानूष हल्ला झाल्याने सर्वस्थरातून रोष व्यक्त होत आहे. विधानपरिषद विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी या घटनेचा निषेध केला आहे. मारहाण करणार्‍या आमदारांची नावे अजून कळाली नसल्याचे सांगत ते म्हणाले, हा प्रकार निषेधार्ह्य आहे. आमदारांनी मारहाण करणे योग्य नाही.

या मारहाण प्रकरणी राज्यातील आयपीएस अधिकार्‍यांनी मुख्यमंत्री चव्हाण यांची भेट घेतली. राज्याचे पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांच्या नेतृत्वात आपीएस अधिकार्‍यांनी मुख्यमंत्र्यांना मारहाण करणार्‍या आमदारांवर कडक कारवाईची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनीही पोलिस अधिकार्‍यांना कारवाईचे आश्वासन दिले आहे.