आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MLA Suspension Final Dicison Takes By Chief Minister

आमदार निलंबनाबाबतचा अंतिम निर्णय मुख्‍यमंत्र्यांकडेच राहिल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मनसेचे आमदार प्रवीण दरेकर, शिवसेनेचे आमदार दिवाकर रावते यांचे निलंबनाबाबत मुख्यमंत्री घेतील त्या निर्णयाला पाठिंबा देण्याचे राष्‍ट्रवादी कॉँग्रेसने जाहीर केल्यामुळे आता निर्णयाची सर्वस्वी जबाबदारी काँग्रेसवर येऊन पडली आहे. मुख्यमंत्र्यांची विरोधकांशी असलेली जवळीक लक्षात घेता निलंबन मागे घेतले जाऊ शकते, असे मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.


दोन्ही आमदारांचे निलंबन मागे घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी सोमवारी दिल्याचे विरोधकांनी सांगितले. त्या अटीवरच विधान परिषदेत सिंचनाच्या चर्चेत सहभागी होण्यास विरोधकांनी मान्यता दिली. मात्र, मंगळवारी ना निलंबन मागे घेण्यात आले ना सिंचनावर चर्चा झाली. उलट विधान परिषदेत रावते यांचे निलंबन मागे घेण्यावरून विरोधकांनी सभात्याग केला तरीही सत्ताधारी आमदारांनी कामकाज रेटून नेले.


निर्णय मुख्यमंत्र्यांच्या गोटात
राष्ट्रवादीने सोमवारीच निलंबनाबाबत भूमिका स्पष्ट केली होती. अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून याबाबत चर्चा केल्याचे समजते. मनसे आमदाराने मुख्यमंत्र्यांचा तर रावते यांनी विधान परिषदेचे सभापती आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे ज्येष्ठ सदस्य शिवाजीराव देशमुख यांचा अवमान केला होता. त्यामुळे त्यांचे निलंबन मागे घ्यायचे की कायम ठेवायचे याबाबत निर्णय काँग्रेसने म्हणजे मुख्यमंत्र्यांनीच घ्यावा, असे अजित पवार यांनी सांगितले.


राष्ट्रवादी काँग्रेसने ही भूमिका घेतल्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनाच आमदारांच्या निलंबनाबाबत निर्णय घेणे भाग आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना यांची जवळीक लक्षात घेता कदाचित आमदारांचे निलंबन मागेही घेतले जाण्याची शक्यता त्यांच्या निकतवर्तीयांकडून सांगितली जात आहे. त्यामुळे उद्याचा दिवस विरोधकांसाठी महत्त्वाचा असून त्यांच्या मागणीला मुख्यमंत्र्यांकडून प्रतिसाद मिळतो का ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


‘रेशन कार्डांनाही बारकोड लावणार’
बोगस रेशन कार्डांना आळा घालण्यासाठी राज्यात बारकोड पद्धतीने रेशन कार्ड देण्याचा राज्य सरकार विचार करत असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या तासादरम्यान दिली. सुरेश हाळवणकर यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
बनावट सही-शिक्के वापरून रेशन कार्डे जारी केल्याचे प्रकरण इचलकरंजीत उघडकीस आले असल्याची बाब त्यांनी देशमुख यांच्या निदर्शनास आणली. या प्रकाराची चौकशी करण्याचे आश्वासन देशमुख यांनी या वेळी दिले. तसेच अनधिकृत तेलसाठा करणा-यांवर धडक मोहीम राबवून कारवाई करणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.