आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार घोसाळकर विरोधात भाजप नगरसेविकेची तक्रार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेना आमदार विनोद घोसाळकर पुन्हा एकदा महिला पदाधिकार्‍यांच्या आरोपावरून टीकेचे धनी बनले आहेत. घोसाळकरांकडून होत असलेल्या मानसिक छळाच्या तक्रारींची स्थानिक पातळीवर कोणतीही दखल घेतली जात नसल्याने भाजप नगरसेविका मनीषा चौधरी यांनी आता दिल्लीतील आपल्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
यापूर्वीही शिवसेनेच्या माजी महापौर शुभा राऊळ व नगरसेविका शितल म्हात्रे यांनी घोसाळकरांकडून होणार्‍या त्रासाबद्दल पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे तक्रार केली होती. मात्र त्यावेळी ठाकरेंकडून घोसाळकरांचीच पाठराखण करण्यात आली होती.
भाजप नगरसेविका मनीषा चौधरी यांच्या प्रयत्नाने बोरीवली भागात दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या नावाने एका चौकाचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. मात्र या चौकाला आता गावदेवी चौक असे नाव द्यावी, अशी मागणी आमदार घोसाळकरांनी महापालिका प्रशासनाकडे केल्याची तक्रार चौधरी यांनी केली आहे. आजवर त्यांनी माझ्या अनेक कामात ढवळाढवळ केली आहे. घोसाळकरांना दुसर्‍याच्या कामाचे र्शेय आपल्या नावावर करण्याची सवयच आहे. ते आपल्याला वारंवार मानसिक त्रास देत असल्याचा आरोपही चौधरी यांनी केला आहे.
गुरुवारी पालिकेच्या प्रभाग समितीच्या बैठकीत त्यांनी घोसाळकरांबाबतच्या तक्रारी जाहीरपणे बोलून दाखविल्या होत्या.

घोसाळकरांबाबतचा यापूर्वीचा अनुभव लक्षात घेता त्यांच्याविरोधात आता दिल्लीतील पक्षनेत्यांकडेच तक्रार करण्याचा निर्णय चौधरी यांनी घेतला असून त्यासाठी त्या दिल्लीकडे रवाना झाल्या असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

राऊळ, म्हात्रेंचा पाठिंबा
नगरसेविका चौधरी यांनी केल्या तक्रारींना शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे व शुभा राऊळ यांनी पाठिंबा दिला आहे. घोसाळकरांच्या विरोधात तक्रार केल्यानंतर आम्हाला लोकसभा निवडणुका असल्याचे सांगून शांत राहण्याचा सल्ला पक्षनेतृत्वाने दिला होता. मात्र निवडणुकीनंतरही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. याउलट आम्हालाच पक्षात दुय्यम वागणूग दिली जात असल्याची खंत व्यक्त करतानाच या दोघींनी शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे.