आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधान परिषद निवडणूक: राणेंना ८ महिने ‘वेटिंग’, राष्ट्रवादीतून अालेल्या लाड यांना तिकीट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसाद लाड उमेदवारी अर्ज दाखल करताना... - Divya Marathi
प्रसाद लाड उमेदवारी अर्ज दाखल करताना...

मुंबई- माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा पत्ता कट करत अखेर भाजपने विधान परिषद निवडणुकीसाठी प्रसाद लाड यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादीतून भाजपत अालेल्या लाड यांच्या नावाला शिवसेनेेनेही संमती दर्शवल्यामुळे अाता या निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित मानला जाताे.  काँग्रेसकडून माजी अामदार दिलीप माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला अाहे. 


दरम्यान, तूर्त अामदारकी मिळत नसल्याने राणेंच्या मंत्रिपदाबाबतही अाता शंका उपस्थित हाेत अाहे. कारण मंत्रिपद मिळाल्यानंतर सहा महिन्यांत अामदार म्हणून निवडून येणे अावश्यक असते अाणि अाता विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी थेट जून-जुलैमध्ये निवडणूक हाेणार अाहे. त्यामुळे एक तर राणेंना मंत्रिपदासाठीही ‘वेटिंग’ करावी लागेल किंवा त्यांच्यासाठी भाजपच्या एखाद्या अामदाराला राजीनामा तरी द्यावा लागेल, असे दाेनच पर्याय सध्या अाहेत. या निवडणुकीत अापला पत्ता कट हाेत असल्याची जाणीव राणे यांना रविवारीच झाली हाेती. या पार्श्वभूमीवर त्यांनी रात्री मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन चर्चाही केली. दाेन तासांच्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी राणेंची समजूत काढली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

 

शिवसेनेच्या विराेधामुळे राणेंची संधी हुकली; मंत्रिपदाबाबतही संभ्रम-

 

पुढील वर्षी जून आणि जुलैमध्ये विधान परिषदेच्या २१ आमदारांची मुदत संपत आहे. यात सगळ्यात जास्त संख्या आठ ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची असून त्याखालोखाल काँग्रेस, भाजपचे चार तर शिवसेनेचे दाेन अामदार निवृत्त हाेत अाहेत.  यापैकी ११ सदस्य हे विधानसभा सदस्यांमधून निवडले जाणार अाहेत. या निवडणुकीच्या वेळी शिवसेनेचा विराेध डावलूनही भाजप नारायण राणेंना निवडून अाणू शकते. कारण एका जागेसाठी पहिल्या पसंतीच्या २७ मतांचा काेटा निश्चित केला जाईल.  भाजपचे सध्या १२२ आमदार असून, छोटे पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने राणे यांच्यासाठी पाचवी जागा भाजप आरामात निवडून आणू शकते. या पाचही जागा निवडून अाणण्यासाठी भाजपला एकूण १३५ मते लागतील. त्यापैकी भाजप महायुतीकडे १२३ मते अाहेत. उर्वरित १२ मतांची बेगमी भाजप व राणेंच्या ‘अार्थिक ताकदीवर’ करणे शक्य हाेईल, असा भाजप नेत्यांना विश्वास वाटताेे.

 

अायारामांचे ‘लाड’; भाजप निष्ठावंतांमध्ये नाराजी-

 

प्रवक्ते गाेविंद भंडारी, शायना एनसी यांना डावलून भाजपने दाेन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून अालेल्या प्रसाद लाड यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपच्या निष्ठावंतांमध्ये नाराजीचा सूर अाहे.  ‘प्रवीण दरेकर व प्रसाद लाड यासारख्या अायात नेत्यांना अामदारकी दिली जात असेल तर पक्षासाठी आयुष्य वेचणाऱ्या नेत्यांनी फक्त कामच करत राहायचे काय?’ असा सवालही उपस्थित केला जात अाहे.  विशेष म्हणजे लाड यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर भंडारी यांची नाराजी लपत नव्हती. मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता असून पक्षाने घेतलेल्या निर्णयाचा आदर करतो, असे ते म्हणाले. तर गेल्या १५ वर्षांपासून मी पक्षाचा निर्णयच मानत अाले अाहे, असा नाराजीचा सूर शायना यांनीही लगावला.

 

काँग्रेसला अाशा ‘अदृश्य बाणा’च्या  चमत्काराची-


काँग्रेसचे उमेदवार दिलीप माने यांचा उमेदवारी अर्ज प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण व इतर नेत्यांच्या उपस्थितीत साेमवारी दाखल करण्यात अाला.  या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे  हेमंत टकले, नवाब मलिक हे नेतेही उपस्थित हाेते. ‘एकंदर परिस्थिती पाहता या पोटनिवडणुकीत ‘अदृश्य बाण’ चालून दिलीप माने विजयी होतील,’ असा विश्वासही अशाेक चव्हाण यांनी व्यक्त केला.

 

राणेंची परवड पाहवत नाही : सुनील तटकरे-

 

 नारायण राणे यांची भाजपने केलेली परवड पाहवत नाही. सत्तेतील स्वार्थासाठी शिवसेनेला सांभाळण्यासाठीच भाजपने त्यांचा पत्ता कापला, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले.

 

माधव भंडारींना पुन्हा डावलले-

 

प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांची दावेदारी भक्कम मानली जात होती. मात्र, पक्षाने त्यांना पुन्हा एकदा डावलले आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी न देता दोन वर्षापूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या प्रसाद लाड यांना उमेदवारी दिल्याने निष्ठावंतांना एक प्रकारे अन्यायच केला आहे. मात्र, भंडारीच्या नावाला सेनेतून विरोध झाला काय असे बोलले जात आहे. शिवसेनेच्या विरोधात वारंवार भूमिका मांडणारे व उद्धव ठाकरेंची खिल्ली उडविण्यात भंडारी कधीही मागे हटले नाहीत. त्यामुळे शिवसेनेने भंडारीच्या नावाला फुली मारली असण्याची शक्यता आहे. पुढील सहा महिन्यात विधान परिषदेच्या 11 जागा रिक्त होत आहेत. त्यामुळे भंडारींना आणखी सहा महिने वाट पाहण्यास पक्षनेतृत्त्वाने सांगितले असू शकते. भंडारी यांना दोन वर्षापूर्वीपासून विधान परिषदेवर पाठविण्याबाबत चर्चा होती मात्र प्रत्येक वेळी काहींना काही अडचण तयार झाली आणि त्यांचे नाव मागे पडत गेले. आता पुन्हा एकदा भंडारीऐवजी प्रसाड लाड यांना संधी दिली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिला आहे.

 

शायना एनसी यांना विधान परिषदेत नव्हे राज्यसभेत रस-

 

भाजपच्या कोषाध्यक्षा व प्रवक्त्या शायना एनसी यांचेही नाव नेहमीप्रमाणे आघाडीवर होते. शिवसेनेचा पाठिंबा मिळविण्यासाठी भाजप शायना एनसी यांचे नाव पुढे करू शकते, अशी चर्चा होती. मात्र, खुद्द शायना एनसी यांना विधान परिषदेत नव्हे तर राज्यसभेत रस आहे. शायना यांना राष्ट्रीय राजकारणात रस आहे. बहुतेक वेळा त्या राष्ट्रीय मुद्यांवर बोलत असतात किंवा पक्षाची बाजू त्या राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवरच मांडताना दिसतात. जून-जुलै 2018 मध्ये राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. सध्याच्या संख्याबळाचा विचार करता भाजप त्यातील तीन जागा आरामात जिंकू शकते. त्यावेळी भंडारी यांना विधान परिषदेत तर शायना यांना राज्यसभेत धाडले जाऊ शकते.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, कोण आहेत प्रसाद लाड आणि दिलीप माने, वाचा त्यांच्याविषयी विस्तृत...

बातम्या आणखी आहेत...