आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनसे कार्यकर्त्यांनी संजय निरुपम यांची घाटकोपर येथील सभा उधळली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांची घाटकोपर येथील सभा शनिवारी मनसे कार्यकर्त्यांनी उधळली. अनधिकृत फेरीवाल्यांना संरक्षण देण्याची निरुपम यांची भूमिका असून मनसे फेरीवाल्यांना विरोध करत आहे. घाटकोपर परिसरातील अनधिकृत झोपड्यांवर महापालिकेने कारवाई केली. या झोपडीधारकांना भेटण्यासाठी निरुपम शनिवारी आले होते. त्या वेळी मनसे कार्यकर्त्यांनी निरुपम यांच्याविरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. मनसे कार्यकर्त्यांच्या आक्रमक घोषणाबाजीमुळे अखेर निरुपम यांना ही सभा आवरती घ्यावी लागली. याबाबत निरुपम म्हणाले, घरे उद्ध्वस्त झालेल्या लोकांना भेटण्यासाठी मी गेलो होतो. सभा संपल्यानंतर काही मनसे कार्यकर्ते तेथे घोषणा देऊ लागले. मात्र, सभा उधळल्याचे त्यांनी खंडण केले.  


मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले, निरुपम यांच्या चिथावणीमुळे काही दिवसांपूर्वी फेरीवाल्यांनी मनसे कार्यकर्त्यांवर हल्ला केला. त्यामुळे मनसेचा निरुपम यांच्याविरोधातील रोष वाढत आहे. परप्रांतीय असल्यामुळेच त्यांचे अशा लोकांना समर्थन आहे. आधी त्यांनी रेल्वे परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांना आमच्या कार्यकर्त्यांविरोधात भडकवले. आतादेखील अनधिकृत झोपडीधारकांना मदत करत असल्याचा दिखावा करत व्होटबँक मजबूत करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. 

 

स्टेजवर पोहचले होते मनसैनिक

झोपडपट्टीमधील नालाबाधितांच्या समस्या जाणून घेण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अचानक मनसेच्या कार्यकर्त्यांनी या सभेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांचीही तारांबळ उडाली. पंतनगर पोलिसांनी तातडीने हालचाल करत काही मनसैनिकांना ताब्यात घेतले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी खूर्च्या उचलून फेकल्या. तर काही स्टेजवर पोहचले. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोखले.

 

निरुपम मनसेचे नवे लक्ष्य?

मालाडमधील काही फेरीवाल्यांनी मनसे कार्यकर्त्यांना मारहाण केली होती. या फेरीवाल्यांना निरुपम यांनी भडकवल्याचा आरोप मनसेने केला होता. याच मारहाणीच्या निषेधार्थ निरुपम यांची सभा उधळल्याची माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली. 

 

सुप्रीम कोर्टानेही दिला निरुपम यांना दणका?

कालच फेरीवाल्यांना पाठिंबा देणारे काँग्रेस नेते संजय निरुपम यांना सुप्रीम कोर्टाने दणका दिला आहे. फेरीवाल्यांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली जात नाही, तोपर्यंत त्यांना हटवू नये, तसेच मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारी त्यांची याचिका कोर्टाने फेटाळली.

 

एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसेने रेल्वे स्थानक परिसरात बेकायदा व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात ठिकठिकाणी आंदोलन केले होते. तर संजय निरुपम यांनी फेरीवाल्यांना पाठिंबा दिला होता. फेरीवाल्यांच्या संघटनेने हायकोर्टात याचिकाही दाखल केली होती. फेरीवाले कुठेही बसून व्यवसाय करू शकत नाहीत. त्यांना फेरीवाला क्षेत्रातच व्यवसाय करण्याची परवानगी आहे. तसेच पादचारी पूल आणि रेल्वे स्थानकाच्या 150 मीटर परिसरात फेरीवाल्यांना व्यवसाय करता येणार नाही, असा निर्णय कोर्टाने दिला होता. या निर्णयाला निरुपम यांनी सुप्रीम कोर्टात याचिकेद्वारे आव्हान दिले होते. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी, तसंच पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली जात नाही, तोपर्यंत फेरीवाल्यांना हटवू नये, अशी मागणी त्यात केली होती. मात्र, हाय कोर्टाचा निर्णय योग्य असल्याचे सांगून सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळली.

 

पुढील स्लाईडवर पाहा मनसेने या सभेत केलेल्या राड्याचे फोटो 

बातम्या आणखी आहेत...