आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MNS Of Raj Thackeray Applied For Permission Of Programme Of Shivaji Park

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यास मनसेचा पाडवा मेळाव्याने शह, शिवाजी पार्कसाठी अर्ज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवाजी पार्क आणि शिवसेना व या पक्षाचा एेतिहासिक दसरा मेळावा हे आता एक समीकरणच बनले आहे. आपला राजकीय अजेंडा राज्यभरातील शिवसैनिकांपर्यंत पोहोचवण्याचे शिवसेना नेतृत्वासाठी हे मैदान म्हणजे एक हक्काचे ठिकाणच बनले अाहे.
शिवसैनिक आणि दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातील संवादाचा एक दुवा म्हणूनही शिवाजी पार्कचा नावलाैकिक अाहे. मात्र, आता याच मैदानाचा वापर आपल्या कार्यकर्त्यांशी नियमित संवाद साधण्यासाठी करावा, यासाठी मनसेनेही कंबर कसली आहे. मराठी नववर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा आणि मराठी भाषा दिन असे दोन दिवस हे मैदान सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आपल्याला मिळावे, यासाठी मनसेने राज्याच्या नगरविकास विभागाकडे अर्ज केला आहे.
मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले आणि राजकीय सभांसाठी प्रसिद्ध असे शिवाजी पार्क अलीकडच्या काही वर्षांत राजकीय सभांसाठी मिळणे दुर्मिळ झाले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सध्या हे मैदान वर्षातून फक्त ४५ दिवस खेळाव्यतिरिक्त इतर वापरासाठी देता येते. त्यानुसार आता राज्य सरकारने महापरिनिर्वाण दिन, दसरा मेळावा, तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ३४ दिवस आरक्षित केले आहेत. उर्वरित ११ दिवसांच्या आरक्षणासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, अशी जाहिरात मध्यंतरी नगरविकास विभागाच्या वतीने वृत्तपत्रात देण्यात अाली हाेती.
या जाहिरातीनुसार मनसेच्या नेत्यांनी मराठी नववर्षाचा पहिला दिवस असलेला गुढी पाडवा आणि मराठी भाषा दिन असे दोन दिवस आपल्याला पक्षाच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मिळावेत, यासाठी अर्ज केल्याची माहिती मनसेचे मुंबई महापालिकेतील गटनेते संदीप देशपांडे यांनी दिली. यापैकी गुढी पाडव्याच्या दिवशी कार्यक्रमाच्या आयोजनाची परवानगी मिळाल्यास त्या दिवशी एक भव्य दिव्य कार्यक्रम घेऊन दसऱ्याला शक्तीप्रदर्शन करणाऱ्या शिवसेनेला शह देण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचेही सांगण्यात येते.

शिवाजी पार्कवर कार्यक्रमासाठी अर्ज
आतापर्यंत शिवसेना, दसरा मेळावा आणि शिवाजी पार्क हे समीकरण बनले आहे. याचप्रमाणे मनसे, गुढीपाडवा आणि शिवाजी पार्क असे आणखी एक समीकरण व्हावे, यादृष्टीने मनसे यापुढे दरवर्षी गुढीपाडव्याला शिवाजी पार्कसाठी अर्ज करणार असल्याची माहिती मनसेच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली.
राजकीय अाखाडा पुन्हा तापवणार
अवघ्या वर्षभरावर मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिक या चार राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. लोकसभा आणि विधानसभेत अतिशय सुमार कामगिरी झाल्यानंतर मनसेसमोर चार महापालिका निवडणुकांचे मोठे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या राजकीय पुनरागमनासाठी यंदाच्या गुढीपाडव्याला शिवाजी पार्कवर एका भव्य जाहीर सभेचे आयोजन करून राजकीय आखाडा तापवण्याचा मनसेचा मानस आहे. याच सभेत एखादा नवा राजकीय मुद्दा उपस्थित करून राज ठाकरे पुन्हा राजकीयदृष्ट्या सक्रिय होतील, असा अंदाज व्यक्त होत आहे.