आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'हो, हे शक्य आहे\' या ब्ल्यू प्रिंटच्या स्लोगनद्वारे राज ठाकरे फुंकणार विधानसभेचे रणशिंग!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज ठाकरेंच्या स्वप्नातील महाराष्ट्र कसा आहे याची प्रतिक्षा आता संपत चालली आहे. येत्या 25 सप्टेंबरला (गुरुवारी) राज ठाकरे महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट जनतेसमोर ठेवणार आहेत. या ब्ल्यू प्रिंटची स्लोगन लाईन आहे 'हो, हे शक्य आहे' अशी. या स्लोगनद्वारे राज ठाकरे राज्याच्या जनतेत व मनसेच्या शिडात हवा भरणार आहेत. ही ब्लू प्रिंट नेमकी असेल आणि त्यात काय-काय असेल याची महाराष्ट्राला प्रतिक्षा आहे.
राज ठाकरे यांनी 10 दिवसापूर्वी येत्या 25 सप्टेंबरला ब्ल्यू प्रिंट राज्यातील जनतेसमोर ठेवू, असे सांगितले होते. त्यानुसार मनसेच्या पक्ष पातळीवर तयारी जोरदार सुरु आहे. ब्ल्यू प्रिंटवर राज ठाकरे व संबंधित नेत्यांनी शेवटचा हात फिरवला आहे. तसेच या ब्ल्यू प्रिंटला 'हो, हे शक्य आहे' ही टॅगलाईन ठेवायची हा निर्णय राज ठाकरेंनी रविवारी घेतला आहे.
लोकसभेला मोदी लाटेसमोर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा जसा धुव्वा उडाला तसाच फटका मनसेच्या उमेदवारांनाही बसला. त्यामुळे मनसेच्या गोटात सध्या शांतता आहे. तसेच कार्यकर्त्यांत जोश आणण्यासाठी राज ठाकरेंना जोमाने व नव्याने सुरूवात करावी लागणार आहेत. राज ठाकरे हे चाणाक्ष व धुर्त राजकारणी आहेत. मागील काही दिवसापासून राज्यातील घडामोडींबाबत त्यांनी काहीही भाष्य केले नाही. लोकसभेच्या निकालानंतर व मोदी सरकार देशात आल्यानंतर बरेच काही घडून गेले आहे, घडत आहे. त्याचे बारकाईने राज ठाकरेंनी निरीक्षण केलेलेच असेल. भाजपने नाशिकमध्ये मनसेचा पाठिंबा काढून घेतला आहे. त्यामुळे मोदींना टार्गेट केल्यानंतर राज ठाकरे आता शिवसेनेवरून आपला मोर्चा भाजपकडे वळवतील असे बोलले जात आहे. सध्या राज्यात भाजपने मोदी-शहा जोडीला फारच महत्त्व दिले आहे. राज्यातील भाजप नेते बाहुले बनले आहेत. खडसे-तावडे-फडणवीस हे अपरिपक्व राजकारण करीत आहेत. विरोधी पक्षांतील भ्रष्ट नेत्यांना ते ऊठ-सुट प्रवेश देत आहेत. मनसेच्या राम कदमांना भाजपने प्रवेश दिल्याने यंदा राज ठाकरेंच्या निशाण्यावर भाजप असणार आहे हे उघड आहे.
असे असले तरी राज ठाकरेंच्या पुढे आव्हाने मोठी आहेत. पक्षातील नेत्यांना व कार्यकर्त्यांना चार्ज करावे लागणार आहे. सर्वात महत्त्वाचे राज्यातील जनतेला विश्वास द्यावा लागणार आहे. आपल्या आमदारांची किमान 20 संख्या नेणे त्यांची राजकीय गरज आहे. युती, आघाडी तुटली तर राज यांना हे सहज शक्य आहे. युती-आघाडी झाली तरी नियोजनपूर्वक प्रचार व प्रसार केले तरी हे शक्य आहे.
शिवसेनेला लक्ष्य न करता उद्धव यांच्याबाबत सहानुभूती ठेवली तर राज्यातील जनता राज यांना मागील चुकांबाबत नक्कीच माफ करू शकते. तसेच मोदी-शहा या गुजराती जोडीवर हल्ला चढविल्यास मराठी लोक राजकडे पुन्हा आकर्षित होऊ शकतात. मागील काही चुकांमधून राज ठाकरे नक्कीच शिकले असतील. तेव्हा राज ठाकरेंच्या ब्ल्यू प्रिंटची महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहत आहे असा विश्वास घेऊन राज मैदानात उतरले तर राज्यातील जनता राज यांना पुन्हा डोक्यावर घ्यायला मागे-पुढे पाहणार नाहीत हे नक्की.