आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा वर्षांपासून सुरू असलेल्या ‘ब्ल्यू प्रिंट’चे काम राज यांनी थांबवले!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ब्ल्यू प्रिंट तयार करण्याचे काम पुणेस्थित मनसे अकादमीकडे सोपवण्यात आले होते. येत्या ऑगस्ट महिन्यात ही ब्ल्यू प्रिंट जाहीर होणार असल्याचे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केले होते. मात्र प्रकाशच्या दीड महिना आधीच अंतिम टप्प्यात आलेल्या या ब्ल्यू प्रिंटचे काम तडकाफडकी थांबवण्याचे आदेश राज यांनी दिले आहेत. आता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या व्यावसायिक कंपनीच्या मदतीने दर्जेदार ब्ल्यू प्रिंट बनविण्यात येणार असून त्यावर दस्तुरखुद्द राज ठाकरे यांचे लक्ष राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे ठरलेल्या वेळी म्हणजे ऑगस्टमध्येच ती प्रकाशित होणार आहे.

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर 2006 मध्ये राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. पक्ष स्थापनेच्या वेळी राज ठाकरे यांनी आपल्या कल्पनेतला प्रगत महाराष्ट्र कसा असेल याचे वर्णन आपल्या भाषणात केले होते. तसेच महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट प्रसिद्ध करण्याची घोषणाही केली होती. त्यानंतर जेव्हा जेव्हा या ब्ल्यू प्रिंटबाबत विचारणा होत असे त्यावेळी त्याचे काम पुण्याच्या मनसे अकादमीत सुरू आहे, असे उत्तर राज ठाकरे देत असत.

पक्षाचे सरचिटणीस अनिल शिदोरे हे या अकादमीचे संचालक म्हणून काम पाहत होते. अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात काम केल्यानंतर शिदोरेंनी मनसेच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. कुपोषण तसेच ग्रामीण अर्थकारण अशा विषयांवर प्रदीर्घ काळ काम केल्याने राज ठाकरेंनी मनसेच्या ब्ल्यू प्रिंटची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवली होती. गेली सहा वर्षे विविध क्षेत्रातली माहिती गोळा करणे, ती संगतवार लावून त्याचे विश्लेषण करणे, सध्याच्या व्यवस्थेतले दोष हेरून त्यावर पर्याय शोधणे, राज ठाकरेंशी वारंवार चर्चा करून त्यांच्या कल्पनेनुसार विविध समाजोपयोगी योजनांचे कच्चे आराखडे तयार करणे आदी कामे शिदोरे व त्यांचे सहकारी करत होते.

प्रसिद्ध ऑगस्टमध्येच होणार
अकादमीला काम थांबवण्याचे आदेश दिल्यानंतर राज ठाकरे यांनी स्वत:च ब्ल्यू प्रिंट बनवण्याच्या कामात लक्ष घातले आहे. त्यासाठी त्यांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या ख्यातनाम कंपनीची मदत घेतली आहे. सध्या ‘टीसीएस’चे अधिकारी आणि पक्षाच्या पदाधिकार्‍यांबरोबर दररोजच्या बैठकांमधून पक्षाची बहुचर्चित ब्ल्यू प्रिंट आकाराला येते आहे. येत्या ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस ती प्रसिद्ध करण्याचा राज ठाकरेंचा मानस आहे.

मोबाइल ‘अँप’चा राग ब्ल्यू प्रिंटवर
राज ठाकरे यांनी शिदोरे यांच्या कामाबद्दल वेळोवेळी जाहीर भाषणांमधून आणि मुलाखतींमधून समाधान व्यक्त केले होते. मात्र आता अचानक त्यांची शिदोरेंवर खप्पार्मजी झाली आहे. त्याला कारण ठरला आहे तो पक्षाचा अधिकृत मोबाइल अँप. शिदोरेंच्या पुढाकाराने सुरू केलेल्या मोबाइल अँपच्या अवास्तव खर्चामुळे राज नाराज असल्याचे सांगितले जाते.

ब्रेक के बाद..!
अनिल शिदोरेंशी संपर्क साधला असता त्यांनी सध्या अकादमीचे काम थांबले असल्याचे कबूल केले, मात्र राज ठाकरेंनी तसे आदेश दिले नसल्याचेही स्पष्ट केले. सहा वर्षे सतत काम केल्यानंतर आम्ही सध्या ब्रेक घेतला आहे. आपण ब्ल्यू प्रिंट तयार केली असून शेवटच्या हात फिरवून ती लवकरच राज ठाकरेंना सुपूर्द करणार आहोत,’ असेही त्यांनी सांगितले.

(फोटो - संग्रहित छायाचित्र)