आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजच्या उपस्थितीत नाक्यावर खळ्ळखट्याक, महिलेस शिवीगाळीमुळे खारेगावात तोडफोड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ठाण्याच्या खारेगाव टोलनाक्यावर गुरुवारी मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीतच टोलनाक्याची तोडफोड केली. एका मनसे महिला पदाधिकार्‍याने या टोलनाक्यावर टोल भरण्यास नकार देताच टोलनाक्यावरच्या कर्मचार्‍याने त्यांना शिवीगाळ केली. त्यामुळे संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली. नाशिक दौर्‍यावर निघालेले राज ठाकरेही नेमके त्याच वेळी तिथे पोहोचले. त्यामुळे तणावात आणखी भर पडली.
दुपारी चारच्या सुमारास काही महिला मनसे पदाधिकारी आपल्या मोटारीने कळव्याला जात होत्या. त्या वेळी खारेगाव इथे आरबीआय कंपनीच्या टोलनाक्यावर त्यांना अडवण्यात आले. पण या मार्गावर कोणत्याही सुविधा नसल्याने आपण टोल भरणार नाही, असे सांगताच टोलवसुलीचे काम करणार्‍या लाखन पगारे या कर्मचार्‍याने शिवीगाळ केल्याचा आरोप या महिला पदाधिकार्‍यांनी केला. या घटनेनंतर या महिलांनी खारेगावच्या मनसे कार्यकर्त्यांना फोन करून बोलावून घेतले. हे कार्यकर्ते टोलनाक्यावर पोहोचताच त्यांनी संबंधित कर्मचार्‍याला बेदम चोप दिला. त्यानंतर काही काळ टोलवसुली बंद पडली. त्याच वेळी सहकार्‍यांसह तीन दिवसांच्या नाशिक दौर्‍यासाठी जाणारे राज ठाकरे तेथे आले. राज ठाकरे आलेले पाहताच मनसे कार्यकर्त्यांना आणखीच जोर चढला. राज गाडीतून उतरताच पोलिसांनी त्यांना टोलनाक्याजवळ जाण्यास अटकाव केला. त्यामुळे संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोरच टोलनाक्याचे प्रचंड नुकसान केले.
परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमार केला. साधारण वीस मिनिटे सुरू असलेल्या या प्रकारामुळे परिसराला छावणीचे रूप आले होते. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या विनंतीनुसार कार्यकर्त्यांना शांत करत राज ठाकरे हे नाशिकच्या दिशेने रवाना झाले. त्यानंतरही टोलविरोधी घोषणा सुरू असल्यामुळे पोलिसांनी शेकडो मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी खारेगाव टोलनाक्यावरील आठ कर्मचार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून शहापूरला राहणार्‍या लाखन पगारे या कर्मचार्‍याला अटक केली आहे.