आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भवादी ‘सीएम’नी राजीनामा द्यावा : मनसेप्रमुखांची टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विदर्भच्या बाजूने मतदान करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा फाेटाे दाखवताना राज - Divya Marathi
विदर्भच्या बाजूने मतदान करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा फाेटाे दाखवताना राज
मुंबई - ‘स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने मतदान करणारे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदावर राहायचा अधिकार नाही, त्यांनी राजीनामा द्यावा,’ अशी मागणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी साेमवारी केली. राज्यात गेल्या वर्षभरात ३३ हजार विहिरी बांधल्याचा राज्य सरकारने अर्थसंकल्पात केलेला दावा फोल असून त्याबाबतची आकडेवारीच सरकारकडे नसल्याची बाब माहिती अधिकाराद्वारे स्पष्ट झाल्याची माहितीही राज यांनी दिली.

मुंबईतील आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ‘सरकारचा हा कारभार पाहूनच भाजपपेक्षा त्याआधीचे काँग्रेसचे सरकार बरे हाेते,’ असे वक्तव्यही राज यांनी केले. महाराष्ट्र दिनाला मुंबईतील हुतात्मा स्मारकावर सरकारने सजावट न करणे म्हणजे हुतात्म्यांचा अपमान असल्याचे सांगत राज यांनी पुन्हा भाजप सरकारवर तोफ डागली. या सजावटीच्या मुद्द्यावरून टोलवाटोलवी करणाऱ्या भाजप-शिवसेनेने महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली. ‘स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करायला हवी. सन २०१३ मध्ये स्वतंत्र विदर्भासाठी लोकांचे मत जाणून घेण्यासाठी एका स्वयंसेवी संस्थेने नागपुरात जनमत चाचणी घेतली हाेती. या वेळी फडणवीस यांनी विदर्भाच्या बाजूने मतदान केले हाेते,’ असे सांगत राज यांनी तेव्हा वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेले छायाचित्रच पत्रकार परिषदेत दाखवले. हे छायाचित्र खुद्द फडणवीस यांनीच त्यांच्या फेसबुक अकाउंटवर टाकल्याचेही राज यांनी स्पष्ट केले.

विहिरी बांधल्याचा सरकारचा दावा खोटा
राज्यात गेल्या वर्षभरात ३३ हजार विहिरी बांधल्याचा दावा अर्थसंकल्पात करत सरकारने आपली पाठ थोपटून घेतली असली तरीही हा दावा पूर्णत: खोटा असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. गुढीपाडवा मेळाव्यात जेव्हा मी हा विषय मांडला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडे सर्व माहिती असल्याचे सांगितले हाेते. मात्र, आपण २२ मार्च रोजी माहितीच्या अधिकारात मुख्यमंत्री कार्यालयाकडे या विहिरी कुठे बांधल्या त्यांची सविस्तर माहिती मागितली असता ही बाब जलसंधारण विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांच्याकडे माहिती मागावी, असे उत्तर आपल्याला मिळाल्याचे राज म्हणाले. त्यावर १२ एप्रिल रोजी जलसंधारण विभागाकडेही माहिती मागितली असता त्यांनीही ही बाब आमच्या अखत्यारीत येत नसल्याचे सांगत सदर माहिती नियोजन आणि रोहयो विभागाकडून घ्यावी, असे लेखी कळवले. त्या विभागाकडेही १८ एप्रिल रोजी माहिती मागितली असता अशी माहिती शासनाकडे संकलित केली जात नसल्याने देता येत नाही, असे उत्तर आपल्याला मिळाल्याचे राज म्हणाले. अशा पद्धतीने जर माहिती देण्यासाठी टोलवाटोलवी केली जात असेल तर मग आमच्याकडे संपूर्ण माहिती असल्याचे मुख्यमंत्री कोणत्या विश्वासाने सांगतात, असा सवालही त्यांनी केला.

शिवसेनेवरही हल्लाबोल
पत्रकार परिषदेत राज यांनी नेहमीप्रमाणे शिवसेनेवरही हल्लाबोल केला. ‘शिवसेना ढोंगी असून त्यांना सत्तेतही बसायचे आहे आणि सरकारविरोधात तक्रारीही करायच्या आहेत. पैसे खाताना हे दोन्ही पक्ष एकत्र असतात. मात्र, पैशाचे काम अडकले की मग आंदोलने करतात,’ असा अाराेप त्यांनी केला.

‘मेक इन इंडिया’चीही केली पोलखोल
मध्यंतरी सरकारने मेक इन इंडिया सप्ताह साजरा करून हजारो कोटींची गंुतवणूक राज्यात आल्याचे दावे केले होते. मात्र हे सर्व दावे खोटे असल्याचे राज ठाकरे म्हणाले. कोकणातल्या दोन लघु उद्योजकांनी आपल्या उद्योगाच्या विस्तारासाठी सरकारकडे पैसे मिळवण्यासाठी अर्ज केला होता. त्यापैकी एकाने दोन कोटी, तर दुसऱ्याने सहा कोटी मागितले होते. त्यांच्याबरोबर या सरकारने अनुक्रमे २०० कोटी आणि सहाशे कोटींचे एमओयू केल्याचे सांगत राज म्हणाले की, ‘हे सरकार कशा पद्धतीने चालवत आहेत याची ही उदाहरणे आहेत.’
राजसाहेबांनी मुंबईत कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. त्यातील काही महत्वाचे मुद्दे, वाचा पुढे...
बातम्या आणखी आहेत...