मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (रविवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जवखेडे दलित हत्याकांडासह काही विषयांवर चर्चा केली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेला केवळ एक जागा मिळाली असून आता पक्षात मोठे फेरबदल केले जातील, असे संकेत राज यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचा प्रयत्न राज यांनी केल्याचे सांगितले जात आहे.
जवखेडे दलित हत्याकांडातील दोषिंना लवकर अटक व्हावी, अशी मागणी यावेळी राज यांनी केली. पोलिस सुरवातील अॅक्शन घेतात. पण त्यानंतर त्यांच्यावर राजकीय दबाव आणला जातो. त्यांच्या पाठिशी कुणी उभे राहत नाही. कोर्टात केसही उभी राहत नाही. मुख्यमंत्री या नात्याने तुम्ही यावर लक्ष ठेवावे, असेही राज यावेळी म्हणाले.
यावेळी राज ठाकरे यांनी ऊसाच्या दरांवरही चर्चा केली. ऊसाला पहिला हप्ता 2500 रुपये तर अंतिम हप्ता 3000 रुपये द्यावा अशी मागणी त्यांनी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली आहे. यासंदर्भात लवकर निर्णय घ्यावा, असेही राज यांनी सुचवले आहे.
राज्यातील पर्यटनाला चालना देण्याची गरज आहे, असेही राज यांनी यावेळी सांगितले. यासंदर्भात मनसेकडून 18 ते 19 नोव्हेबर दरम्यान मुख्यमंत्र्यांसमोर प्रेझेंटेशन सादर केले जाणार आहे. त्यातून रोजगार निर्मिती आणि उत्पन्न कसे वाढले जाईल, याची माहिती दिली जाणार आहे.
नाशिक महानगरपालिका मनसेच्या ताब्यात आहे. गेल्या काही महिन्यांपासून या महापालिकेला आयुक्त नाही. आयुक्तांची नेमणूक लवकर करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.