आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादाला फाेडणी: संभाजीराजे हे वडिलांशी भांडून मुघलांना मिळाले होते: मनसे प्रमुख राज ठाकरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘संभाजीराजे हे वडिलांशी भांडून मुघलांना जाऊन मिळाले होते. ज्यांच्याविरोधात लढण्यात शिवाजी महाराजांची हयात गेली त्यांनाच संभाजीराजे जाऊन मिळाले,’ असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी केले. महापालिका निवडणुकांसाठी मनसेने मुंबईत उभारलेल्या वॉर रूमच्या उद््घाटनाच्या वेळी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी थेट संवाद साधताना राम गणेश गडकरी पुतळ्यासंदर्भातल्या वादावर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. त्यावर मराठा संघटना व इतिहासकारांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्याने नवा ‘राज’कीय वाद उद््भवण्याची चिन्हे अाहेत.  
 
आपल्या ‘राजसंन्यास’ नाटकात छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा दावा करत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याची नासधूस केली होती. त्यावरून उठलेले राजकीय वादळ शांत होते न होते तोच संभाजी महाराजांविषयी वरील वक्तव्य करत राज ठाकरेंनी नव्याने या वादात उडी घेतली आहे. गडकरींचा पुतळा हटवल्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना राज म्हणाले की,  ‘पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांनी इतिहास कितपत वाचलाय याची आपल्याला कल्पना नाही. बहुधा राम गणेश गडकरी हे नितीन गडकरींचे नातेवाईक असावेत, असे या समाजकंटकांना वाटले असावे. निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापवण्यासाठीच हा उद्योग केला असावा,’ असा टाेलाही त्यांनी लगावला.    
‘संभाजी महाराजांबद्दल सर्वांनाच आदर आहे. मात्र संभाजीराजे हे वडिलांशी भांडून मुघलांना जाऊन मिळाले होते. ज्यांच्याविरोधात लढण्यात शिवाजी महाराजांची हयात गेली, त्यांनाच संभाजीराजे जाऊन मिळाले होते,’ याकडेही राज ठाकरे यांनी लक्ष वेधले.  
 
वाचाळांना धडा शिकवू : संभाजी ब्रिगेड  
राज यांच्या वक्तव्याचा संभाजी ब्रिगेडने तीव्र निषेध केला. संभाजी महाराजांच्या राजकारणावर बोलण्यापूर्वी अगोदर राज यांनी आपले राजकारण पाहावे, इतिहासाचा अभ्यास करावा, गडकरींनी संभाजी महाराजांबद्दल काय लिहिले ते वाचावे. न वाचता वाचाळवीरांच्या यादीत राज ठाकरे आतापर्यंत बसत आल्यानेच त्यांच्या राजकारणाची नौका बुडालेली आहे. तरीही ते असे वक्तव्य करत असतील तर एक शिवप्रेमी म्हणून आम्ही त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी दिली.
 
शिवरायांनीच संभाजींना शृंगारपुरात पाठवले : काेकाटे  
आदिलशहा, मुघल आणि पोर्तुगीज यांच्याविरोधात संभाजीराजे लढले. मात्र, शिवकालीन किंवा संभाजी महाराजांच्या काळातील लढाई ही राजकीय लढाई होती, ते काही धर्मयुद्ध नव्हते. तसेच छत्रपती संभाजीराजांना ठार मारण्याचा कट ब्राह्मण मंत्र्यांनी केला होता. याची चाहूल शिवरायांनादेखील लागलेली होती. त्यामुळेच शिवाजीराजे म्हणाले होते की, ‘रायगडावर कली माजला. तो कली म्हणजे मयुरादी कुमंत्री म्हणजेच मोरोपंत,’ असे शिवभारतकार परमानंददेखील सांगतात. त्यामुळेच शिवरायांनी दक्षिण दिग्विजयाला जाताना संभाजीराजांना रायगडावर न ठेवता सुरक्षित अशा शृंगारपुरात ठेवले. ब्राह्मण मंत्र्यांच्या कटापासून वाचण्यासाठी संभाजीराजे दिलेरखानाला जाऊन मिळाले. त्यामुळेच संभाजीराजांचा प्राण वाचला, अन्यथा मंत्र्यांनी १६७८ ला शंभुराजांना ठार मारले असते, असे प्राच्यविद्या अभ्यासक शरद पाटील आपल्या विवेचनात सांगतात, अशी माहिती इतिहास आणि प्राच्यविद्या अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

पुढील स्लाइडवर वाचा, भाजपकडे भरमसाट नोटा आल्या कुठून?....