आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनसेकडून नागरिकांना शंभराच्या सुट्या नोटा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दोन हजार रुपयांच्या नव्या नोटेच्या बदल्यात सुट्या पैशांची अनुपलब्धता आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आता मनसे पुढे सरसावली आहे. मुंबईतील दादर, प्रभादेवी आणि माहिम परिसरातील नागरिकांसाठी मनसेच्या वतीने दोन हजारांच्या नव्या नोटेच्या बदल्यात शंभर रुपयांच्या सुट्या नोटा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सुट्या शंभरच्या नोटांच्या उपलब्धतेनुसार ही सेवा देण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर पंधरा दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे, तरीही अजून चलनपुरवठा सुरळीत झालेला नाही. सध्या मुंबईतील काही एटीएममधून दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा मिळू लागल्या आहेत. मात्र, शंभर किंवा त्यापेक्षा कमी किमतीच्या चलनी नोटा पुरेशा संख्येने चलनात उपलब्ध नसल्याने सुट्या पैशांअभावी नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. नागरिकांची होणारी ही गैरसोय टाळण्यासाठी मनसेचे मुंबई महापालिकेतील गटनेते संदीप देशपांडे आणि नगरसेवक संतोष धुरी यांनी एक अनोखी शक्कल लढवली आहे. आपल्या प्रभागातील नागरिकांना दोन हजार रुपयांच्या नव्या नोटेच्या बदल्यात शंभर रुपयांच्या नोटा सुट्या पैशांच्या स्वरूपात दिल्या जात आहेत. गुरुवारी पहिल्याच दिवशी देशपांडे यांच्या दादरच्या कार्यालयात सुरू केलेल्या या उपक्रमाला जोरदार प्रतिसाद मिळाला असून सुटे पैसे संपल्याने अनेकांना रिकाम्या हातांनी परतावे लागले. पहिल्या दिवशी तब्बल १३५ जणांनी या उपक्रमाचा लाभ घेतला असून यामध्ये प्रमुख्याने ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना प्राधान्य दिल्याची माहिती देशपांडे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

सुटे पैसे मिळवण्याचा प्रयत्न : देशपांडे
आज आम्ही २ लाख ७० हजार रुपयांच्या शंभराच्या सुट्या नोटांचे वाटप केले. त्या बदल्यात आम्हाला मिळालेल्या दोन हजार रुपयांच्या १३५ नोटांचे पुन्हा सुटे पैसे करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असून त्यासाठी काही बँकांशी आम्ही संपर्क करण्याच्या विचारात आहोत. तसेच उपक्रमाबद्दल ऐकून आमच्या एका सहकाऱ्याने पन्नास हजारांची शंभर रुपयांच्या स्वरूपातील रोकड देण्याचे कबूल केले आहे. त्यामुळे सध्या तरी शक्य होतील तिथून सुटे मिळवण्याचा प्रयत्न असल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...