आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेचे नवनिर्वाचित नगरसेवक राज ठाकरेंच्या भेटीला, एका अपक्षाचाही समावेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवनिर्वाचित सर्व 9 नगरसेवक पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. दादरमधील कृष्णकूंज या राज ठाकरेंच्या निवासस्थानी हे सर्व नगरसेवक दाखल झाले आहेत. त्यांच्यासमवेत राजू पाटील यांच्यासह स्थानिक नेते उपस्थित आहेत. राज ठाकरेंच्या भेटीला एक अपक्ष नगरसेवकही दाखल झाला आहे. हा अपक्ष नगरसेवक मनसे नेते राजू पाटील यांचा समर्थक आहे. मनसेने त्याला तिकीट नाकारल्यानंतर तो बंडखोरी करीत अपक्ष म्हणून उभा राहिला व आता निवडूनही आला आहे. मात्र, आपण मूळचे मनसेचाच कार्यकर्ता असल्याचे सांगत राजू पाटलांसह राज ठाकरेंच्या भेटीला गेला आहे.
या भेटीदरम्यान राज ठाकरे शिवसेनेसोबत जायचे की भाजपसोबत याबाबत नगरसेवकांचे मत अजमावून घेतील. तसेच भाजप-शिवसेनेशी समान अंतरावर राहायचे झाल्यास तटस्थ भूमिका घेता येईल काय याचीही चाचपणी ते करणार आहेत. नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर राज ठाकरे त्यांना मार्गदर्शन करतील.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर झाले. यात मनसेला केवळ 9 जागा जिंकता आल्या. 2010 च्या निवडणुकीत कल्याण-डोंबिवलीत मनसेची लाट होती. त्यावेळी मनसेचे 28 तर शिवसेनेचे 31 नगरसेवक विजयी झाले होते. भाजपचे 9 तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे 15-15 नगरसेवक निवडून आले होते. यंदा मात्र, मनसेची 28 वरून 9 संख्या झाली तर भाजपची 9 वरून 42 वर संख्या गेली. शिवसेनेने 31 वरून 52 पर्यंत संख्याबळ गाठले. तर, काँग्रेस- राष्ट्रवादीची संख्या 30 वरून 6 पर्यंत घसरली आहे.
दरम्यान, मनसेचे सरचिटणीस नितीन सरदेसाई यांनी नैसर्गिक मित्र म्हणवून घेणा-या भाजप-शिवसेनेने आधी आपली भूमिका स्पष्ट करावी असे म्हटले आहे. मनसे कोणाला पाठिंबा देणार या प्रश्नांवर त्यांनी हा चेंडू शिवसेना व भाजपच्या कोर्टात ढकलला आहे.