आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेची दुसरी यादी जाहीर: भिवंडीतून सुरेश म्हात्रे तर ठाण्यातून अभिजित पानसे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मनसेने आज आपली दुसरी यादी जाहीर केली. शिवसेनेतून नुकतेच मनसेत आलेल्या अभिजित पानसे यांना ठाण्यातून तर, भिवंडीतून सुरेश म्हात्रे यांना लोकसभेचे तिकीट देण्यात आले आहे. त्याचबरोबर मावळ मतदारसंघातल्या अपक्ष उमेदवाराला मनसे पाठिंबा देणार आहे. याचबरोबर मनसे राज्यात 48 पैकी केवळ 9 लोकसभा मतदारसंघातच निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेने 12 जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र, यंदा फक्त नऊ जागांवरच लढण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे नितीन गडकरी यांनी मनसेने लोकसभेसाठी उमेदवार उभे करू नयेत यासाठी भेट घेतली होती. त्याचाच परिणाम म्हणून मनसेने मोजकेच उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतलेला दिसत आहे.
भिवंडीत भाजपचा उमेदवार तरीही मनसेचा उमेदवार का?- महायुतीच्या जागावाटपात भिवंडीची जागा भाजपला सुटली असून तिथे अजूनही योग्य उमेदवार भाजपला मिळालेला नाही. शिवसेनेच्याच एखाद्या पदाधिकार्‍याला तिथून भाजपच्या तिकिटावर उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याचे कळते. मात्र मित्रपक्षातून उमेदवार आयात करायला भाजपच्या स्थानिक नेत्यांचा विरोध आहे. अशा वेळी भाजपतर्फे आयात केलेल्या उमेदवाराला भाजपची उमेदवारी मिळाल्यास नाराज भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांची छुपी मदत मनसेच्या उमेदवाराला होऊ शकते. तसेच सुरेश म्हात्रे यांचे या भागात सर्व पक्षातल्या नेत्यांशी असलेले संबंध लक्षात घेता मनसेला त्याचा फायदा होऊ शकेल, असा अंदाज मनसे नेतृत्वाचा असल्याचे कळते. त्यामुळेच फार विचार न करता सुरेश म्हात्रेंची उमेदवारी जाहीर केली आहे.
ठाण्यातून अभिजित पानसे का?- ठाण्यात मनसेकडे राजन राजे आणि सतीश प्रधान यांच्यानंतर त्या तोलामोलाचा नेता नाही. ठाण्यात शिवसेनेची चांगलीच ताकद असल्याने नुकतेच सेनेतून मनसेत आलेल्या पानसेंना उमेदवारी दिल्यास सेनेची काही मते पानसे खेचू शकतो. ठाण्यात सेनेने तगडा उमेदवार दिला आहे. तो राष्ट्रवादीच्या संजीव नाईक यांची दमछाक करण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत मनसेची ताकद व सेनेतील मते फोडून संजीव नाईकांना 'अपेक्षित' सहकार्य व्हावे हीच खेळी मनसेची आहे.