आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसे सरचिटणिसांना अट्टहासामुळेच बढती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कालपर्यंत ‘सरचिटणीस'पदी असणारे मनसचे शिलेदार आता ‘नेते'पदी विराजमान झाले आहेत. या बदलामागे पक्षाचे हित किंवा कोणतीही विशेष रणनीती नसून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आपले स्थान अबाधित ठेवण्याचा केलेला प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रिक्त असलेल्या चार सरचिटणीस पदांवर आपल्यापेक्षा कनिष्ठ नेत्यांना बढती मिळून त्यांना आपल्या समकक्ष करण्याऐवजी आम्हालाच बढती द्या, असा तगादा निकटच्या वर्तुळातील या नेत्यांनी मनसे अध्यक्षांकडे लावला होता. त्यामुळेच ‘नेता' नावाचे हे नवे पद अस्तित्वात आल्याची जोरदार चर्चा पक्षात आहे.

पक्षस्थापनेवेळी मनसेत अध्यक्ष्यांनंतर सरचिटणीस हे पद होते. आता सरचिटणीस या पदापेक्षा आणखी वर नेता हे पद निर्माण करण्यात आले आहे. पूर्वी सरचिटणीसपदावर बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिशिर शिंदे, शिरीष पारकर, अतुल चांडक, वसंत गिते, प्रवीण दरेकर, अविनाश अभ्यंकर, शिरीष सावंत, श्वेता परूळकर व अनिल शिदोरे यांची नियुक्ती केली होती.
यापैकी श्वेता परूळकर यांनी २००९ मध्ये पक्षाला रामराम ठोकला होता, तर पक्ष स्थापनेच्या वेळी सरचिटणीसपदी नियुक्ती झालेल्या चार नेत्यांपैकी शिरीष पारकर हे सध्या पक्षात सक्रिय नसल्याने तसेच प्रवीण दरेकर, अतुल चांडक आणि वसंत गिते यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने सरचिटणीसस्तरावरची पाच पदे रिक्त झाली होती. त्यामुळे संघटनात्मक फेरबदल करताना सरचिटणीस पदांच्या संख्येत आणखी वाढ करून त्या पदांवर पक्षाच्या दुसऱ्या फळीतल्या सक्रिय नेत्यांची नियुक्ती करण्याची योजना होती. त्यामुळे राज्यातल्या अधिकाधिक नेत्यांना सक्रिय करून अधिक जोमाने पक्ष विस्तार करता येईल, असा हेतू होता. मात्र तसे झाल्यास कालपर्यंत आपल्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या नेत्यांना आपल्या समकक्ष आणल्याने पक्षातले आपले वजन कमी होईल, या भीतीपोटी पहिल्या फळीतल्या नेत्यांनी आपल्यालाच बढती द्यावी, अशी गळ अध्यक्षांना घातली. अखेर त्यांची ही मागणी मान्य करत राज ठाकरेंनी सरचिटणीस हे संघटनेतील पद कायम ठेवत जुन्या सरचिटणीसांना मात्र नेतेपदी बढती दिली आहे. मात्र ‘नव्या' नेत्यांच्या या हुशारीवर सामान्य कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर असून त्याची जोरदार चर्चा सध्या पक्षात सुरू आहे.

शिवसेनेवर टीका करणे टाळले
ठाण्यातील मेळाव्यात राज ठाकरे यांनी शिवसेनेवर टीका करण्याचे टाळले. उद्धव आणि आपल्या भेटीचा खुलासा करताना केलेल्या शिवसेनेच्या उल्लेखाव्यतिरिक्त त्यांनी शिवसेनेचा उल्लेखही टाळला. भाजपला मात्र या भाषणादरम्यान वेळोवेळी त्यांनी लक्ष्य केल्याने आगामी महापालिका निवडणुकांमध्ये राज यांच्या निशाण्यावर भाजप असेल, अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.