आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MNS Make Its Experiments At Nashik, Action Plan Before Election

नाशिक ठरणार मनसेची ‘प्रयोगशाळा’ !,निवडणुकांपूर्वी विकासाचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार करणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेसाठी नाशिक ही एक प्रयोगशाळा ठरणार आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकच्या विकासकामांवर लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या आठवड्यातील विकासकामांच्या भूमिपूजनाच्या धडाक्यानंतर येत्या मंगळवारी नाशिकच्या सर्व नगरसेवकांना आणि महापौरांना राज यांनी मुंबईत बोलावले आहे. मंगळवारी होणा-या या बैठकीत आगामी सहा महिन्यांसाठीचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ठरणार आहे.


आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने मनसेने नाशिकच्या विकासकामांवर लक्ष केंद्रित केले आहे. कारण राज्यभरातील महत्त्वाच्या महानगरपालिकांपैकी नाशिक येथेच मनसेची सत्ता आहे. त्याचबरोबर आगामी कुंभमेळ्याच्या विकासकामांचा मोठा निधीही विकासकामांसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आगामी सहा महिन्यांत विकासकामांचा धडाका लावून नाशिककरांमधील नाराजी दूर करण्यासाठी मनसेने हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचबरोबर सत्ता मिळाल्यास मी काय करू शकतो, याचा दाखला आगामी निवडणुकीच्या प्रचारात, विशेषत: विधानसभेच्या प्रचारात देण्यासाठी राज ठाकरेंच्या हाती काहीतरी असावे यासाठी नाशिक ही मनसेसाठी प्रयोगशाळा ठरणार आहे. त्यामुळे मोठे आणि चर्चेत येतील असे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी स्वत: राज यांनी कंबर कसली आहे.
मनसेच्या या अ‍ॅक्शन प्लॅनअंतर्गत कोणकोणते महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे, याबाबतची माहिती मनसेच्या एका स्थानिक नेत्याने दिली आहे. त्यानुसार शहरातील एकूण 94 कि.मी.रस्त्यांच्या रुंदीकरण आणि डांबरीकरणासाठी 400 कोटींचे ग्लोबल ट्रेंडर काढण्यात येणार आहे.


त्याचबरोबर पांडव लेण्यांच्या पायथ्याशी एक भव्य असे थीम गार्डन उभारण्यात येणार आहे. ज्यासाठी स्वत: राज स्वत: नियोजन करत आहेत. या कामासाठी मुंबईतील एका बड्या विकसकाला नाशिकला नेऊन राज यांनी त्या जागेची पाहणीही केली होती. लवकरच या आंतरराष्ट्रीय अशा थीमपार्कची घोषणा करण्यात येणार आहे.

गोदा पार्कसह इतर प्रकल्पांचे नियोजन
गोदा पार्क सुशोभिकरण, खत प्रकल्पाचे खासगीकरण, दादासाहेब फाळके स्मारक प्रकल्प, तारांगण प्रकल्प या प्रकल्पांसाठीही नियोजन सुरू आहे. कुंभ मेळाव्यासाठी 2 हजार 359 कोटी इतका मोठा निधी शहराच्या विकासकामांसाठी खर्च करण्यात येणार आहे. त्यातील 1052 कोटी एवढा निधी महापालिकेच्या माध्यमातून खर्च केला जाणार आहे. हा निधी राज्य सरकारच्या विशेष समितीकडून महापालिकेला लवकर उपलब्ध व्हावा यासाठी मध्यंतरी राज ठाकरेंनी मुंबईत मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली होती.


नगरसेवकांवर जबाबदारी पडणार
मनसेच्या एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार याच प्रकल्पांसाठी अ‍ॅक्शन प्लान मंगळवारच्या नगरसेवकांच्या बैठकीत सांगण्यात येणार आहे. तसेच येत्या सहा महिन्यांत नगरसेवकांनी करायचे कामे त्यांना समजावून सांगण्यात येतील. या प्रकल्पांच्या कामात अधिकाधिक पारदर्शकता आणून चांगल्या दर्जाचे काम करून घेण्यावर लक्ष देण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात येणार आहेत. जेणेकरून प्रचारादरम्यान एक खणखणीत नाणे म्हणून नाशिकचे विकास प्रकल्प लोकांसमोर सादर करता येतील.