आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mns Mla Mangesh Sangale\'s Function, Raj Keep Quits After Sena\'s Blame

भांडुपमधील थीम पार्कचे राज ठाकरेंकडून भूमिपूजन, सेनेच्या आरोपाने \'तोंडावर पट्टी\'!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(भांडुपमधील मनसेचे आमदार मंगेश सांगळे यांच्या विधानसभा क्षेत्रात भांडुपेश्वर कुंडजजवळ उभारण्यात येणा-या थीम पार्कचे ग्राफिक)
मुंबई- मुंबईतील भांडुप विधानसभा मतदारसंघातील मनसेचे आमदार मंगेश सांगळे यांनी पुढाकार घेऊन उभारलेल्या थीम पार्कच्या भूमिपूजन मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या हस्ते करण्यात आले. मात्र हे थीम पार्कचे बांधकाम अवैधरित्या केले असल्याची तक्रार शिवसेनेने कांजूर पोलिस ठाण्यात केल्याने राज ठाकरे केवळ उद्घाटन करून काहीही न बोलता निघून गेले. दरम्यान, यावरून शिवसेना आणि मनसे पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत.
भांडुपमधील मनसेचे आमदार मंगेश सांगळे यांच्या विधानसभा क्षेत्रात भांडुपेश्वर कुंडजजवळ 20 हजार स्क्वेअर मीटर जागेवर हे थीम पार्क उभारले जात आहे. हे थीम पार्क मीठागराच्या जागेवर असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. केंद्र सरकारने 99 वर्षांच्या लीजवर मीठागरला जागा दिली आहे. हे लीजचा कार्यकाळ 2016 पर्यंत असल्याने, मुदत संपण्याआधीच बांधकाम केल्याने हे थीम पार्क अवैध ठरत असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भूमीपूजन सोहळ्यानंतर कोणतेही भाष्य न करता निघून जाणे पसंत केले.
शिवसेनेचे नेते दत्ता दळवी यांनी या थीम पार्कला विरोध दर्शिवला आहे. या थीम पार्क प्रकल्पासाठी सॉल्ट कमिशनकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतले नाही, असा दावा दळवी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला. ते म्हणाले, आज झालेले उद्घाटन केवळ तलावाच्या सुशोभीकरणाचे आहे. मात्र मनसेच्या नेत्यांनी थीम पार्कचे उद्घाटन असल्याचे बॅनर लावले आहेत. त्यामुळे हे थीम पार्क म्हणजे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. या बांधकामाबाबत आम्ही पोलिसांत तक्रार दिली असून याला आमचा विरोध असणार आहे.

मनसेचे आमदार मंगेश सांगळे यांनी मात्र शिवसेनेचे आरोप फेटाळून लावले आहेत. याबाबत माहिती देताना सांगळे म्हणाले की, थीम पार्कच्या प्रकल्पासाठी मी गेली दोन वर्षे पाठपुरावा करत आहे. ही जागा सॉल्ट विभागाची जागा नसून, राज्य सरकारची आहे. तसेच राज्य सरकारने या प्रकल्पाला पर्यटनस्थळ म्हणून परवानगी दिली आहे. शिवसेनेने केलेले आरोप केवळ राजकीय प्रेरित असून, सामान्य लोकांना अशा सुविधांपासून वंचित ठेवण्याचा प्रकार आहे. शिवसेना या प्रकल्पावरून पोलिसांवर दबाव आणत असल्याचा आरोपही सांगळे यांनी केला. असे असले तरी भूमिपूजन उद्घाटन कार्यक्रमानंतर राज ठाकरे काहीही न बोलता निघून गेल्याने शिवसेनेच्या दाव्यात काही तथ्य असू शकते असे बोलले जात आहे. दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना व मनसेत पुन्हा एकदा वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.