आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mns Mla Vasant Gite May Leave Mns Before Assembly Election

नाशिक मनसेत खलबते: आ. वसंत गितेंच्या घरी राज जाताच नाराजी दूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- राज ठाकरे आणि वसंत गितेंचे संग्रहित छायाचित्र)
नाशिक- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे एकीकडे मनसेची मोट बांधत असतानाच, त्यांचे कट्टर सर्मथक आमदार वसंत गिते पक्षाला रामराम ठोकणार असल्याची चर्चा सध्या नाशिकमध्ये जोरदार सुरु आहे. याच घडामोडीमुळे राज ठाकरे व मनसेला चांगलाच धक्का बसला असून, राज ठाकरेंसह आमदार नितीन सरदेसाई, प्रकाश दरेकर व दीपक पायगुडे आज सकाळी वसंत गितेंच्या घरी दाखल झाले. या भेटीत वसंत गितेंची नाराजी दूर करण्यात राज यांच्यासह या नेत्यांना यश आल्याचे सांगण्यात येत आहे. मी नाराज नाही असे राज यांच्या भेटीनंतर आमदार वसंत गिते यांनी सांगितले. गिते भाजपमध्ये जाणार असल्याचे बोलले जात आहे. गिते समर्थकांनी रविवारी जबरदस्त शक्तीप्रदर्शन करीत राज ठाकरेंना द्यायचा होता तो तो संदेश दिल्याचे बोलले जात आहे. नाशिक मनसेचे सरचिटणीस अतूल चांडकही नाराज असल्याचे कळते.
रविवारी राज ठाकरे यांचे नाशिकमध्ये आगमन झाले. मात्र राज यांच्या स्वागतासाठी गिते व त्यांचे समर्थक नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे गिते हे मनसेवर व खासकरून राज ठाकरेंवर नक्की नाराज असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, गितेंच्या समर्थकांनी प्रकृतिअस्वास्थामुळे गिते अनुपस्थित असल्याची सारवासारव केली. मात्र, गितेंचे सर्मथक नगरसेवक व काही पदाधिकार्‍यांची गैरहजेरी चाणाक्ष राज यांच्या तत्काळ लक्षात आली. त्यामुळे नाशिक मनसेत काय चालले आहे याची राज यांना लागलीच जाणीव झाली.
वसंत गिते नाराज होण्याला लोकसभा निवडणुकीची किनार असली तरी ताज्या झालेल्या स्थायी समिती अध्यक्षपद निवडीनंतर त्यांनी पक्षच सोडण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा नाशकात आहे. राज ठाकरे यांनी लोकसभेला उमेदवार देताना गिते यांना विचारात न घेता डॉ. प्रदीप पवारांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे गिते पक्षावर आधीच नाराज होते. त्यातच आता नाशिक महापालिकेत स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आमदार उत्तमराव ढिकले यांचा मुलगा राहुल ढिकले याला निवडून आणले. यावेळीही गितेंना विश्वासात घेतले नाही.
नाशिक मनसेमध्ये दोन गटांमधील धुसफूस नेहमीच चर्चेचा विषय ठरली. मात्र, त्यास लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर चांगलेच खतपाणी मिळाले. यापूर्वी मनसेची सूत्रे गिते यांच्याकडे होती. लोकसभा निवडणुकीतील पराभावानंतर ती संपर्कप्रमुख अविनाश अभ्यंकर (जे मुंबईचे आहेत) यांच्याकडे गेली. पाठोपाठ स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीतही गिते यांना डावलून आमदार बाळा नांदगावकर व नितीन सरदेसाई यांना चर्चेसाठी पाठविण्यात आले व त्यांनी राहुल ढिकलेंना उमेदवारी दिली. या परिस्थितीमुळे गिते नाराज असल्याची जोरदार चर्चा होती.
राज ठाकरे यांच्या रविवारपासून सुरू झालेल्या दौर्‍याकडे गिते यांनी पाठ फिरवल्याने या चर्चेला ऊत आला. गुडघ्यावरील शस्त्रक्रियेमुळे ते अनुपस्थित असल्याचे पदाधिकार्‍यांनी सांगितले. मात्र, ठाकरे यांच्या स्वागतासाठी मनसेतील नगरसेवकांचा एक गट नसल्याचे समोर आल्यावर मग कोण हजर, कोण गैरहजर, याचा आढावा घेण्याची जबाबदारी गटनेते अशोक सातभाई यांच्याकडे गेली. त्यांनी जवळपास 35 नगरसेवक हजर असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात पंधराहून अधिक नगरसेवक व यापूर्वी महत्त्वाची जबाबदारी पेलणारे पदाधिकारी अनुपस्थित असल्याचे समोर आले. त्यामुळे राज यांचा दौरा चांगलाच गाजण्याची चिन्हे असून, पक्षातील नाराजांच्या आव्हानावर कसा तोडगा निघतो, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, राज यांनी गिते यांची आज भेट घेतल्यानंतर आपण पक्षात नाराज नाही असा सूर लावला.
पुढे वाचा, वसंत गितेंचे जोरदार शक्तीप्रदर्शन...