आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्लेषण : नव्या घरोब्यामुळे बुडत्या मनसेचा पाय खोलात !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आधीच राजकीयदृष्ट्या अडचणीत असलेल्या मनसेच्या अडचणीत सध्या दिवसागणिक भर पडत चालली आहे. उमेदवारांची चणचण आणि वारंवार बदलणार्‍या राजकीय भूमिकांच्या गोंधळामुळे अगोदरच अडचणीत असलेल्या मनसेची नाशिकमध्ये महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेतल्याने अधिकच कोंडी झाली आहे. त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मनसेच्या आव्हानातली हवा काढून घेण्यासाठी
शिवसेनेने भाजपच्या साथीने लावलेला हा सापळा होता, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

"बुडत्याचा पाय खोलात' या उक्तीचा अनुभव सध्या मनसेला येत आहे. शुक्रवारी नाशिक महापौर पदाच्या निवडणुकीत आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी मनसेने अखेर काँग्रेस आघाडीची मदत घेतली. अडीच वर्षांपूर्वी याच महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज ठाकरेंनी काँग्रेस आघाडीवर विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भुजबळांना लक्ष्य केले होते. शहराचे वाटोळे करणार्‍या या भ्रष्टाचार्‍यांना सत्तेपासून दूर ठेवा, असे आवाहन करत मिळवलेल्या मतांच्या जोरावर राज ठाकरेंचा मनसे हा पक्ष तब्बल ३९ जागा मिळवत नाशिक महापालिकेतला सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र १२२ जागांच्या महापालिकेत बहुमत नसल्याने भाजपला साथीला घेत मनसेने त्या वेळी पहिल्यांदाच नाशिक महापालिकेच्या सत्तेचा सोपान गाठला होता. पण या वेळी भाजपने आपली भूमिका बदलत िशवसेनेबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याने सत्ता टिकवण्याचे सर्वात मोठे आव्हान मनसेसमोर उभे ठाकले होते.
मनसेची धडपड कशासाठी?
पहिल्यांदाच मिळालेल्या नाशिक पालिकेतील सत्ता कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच सोडण्याची नामुष्की टाळायची होती. गोदापार्कसारखे प्रकल्प पुढे रेटण्यासाठी सत्ता हवी होती. कुंभमेळ्यासाठी केंद्राकडून मिळणार्‍या निधीच्या आधारावर मनसेने शहराच्या विकासाची अनेक स्वप्ने रंगवली आहेत, त्यांचाही भंग झाला असता. सत्तेबाहेर राहिल्यास पक्षांतर्गत फुटीचाही सामना करावा लागला असता.

शिवसेनेची राजकीय खेळी
मनसेचा नवा घरोबा शिवसेनेच्या पथ्यावर पडला आहे. कारण या तडजोडीमुळे मनसेवर विधानसभेत हल्लाबोल करण्याची आयतीच संधी शिवसेनेला मिळाली आहे. शिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेतल्याने आता विधानसभेच्या प्रचारात मनसेलाही या काँग्रेस आघाडीविरोधात टीका करता येणार नसल्याचा दुहेरी आनंद शिवसेनेला झाला आहे.
परिणाम काय होणार?
दोन्ही काँग्रेसशी घरोब्यामुळे मनसेला आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीच्या टीकेला तोंड द्यावे लागणार आहे. आणि दुसरीकडे काँग्रेस आघाडीवरही हातचे राखूनच टीका करावी लागेल. त्यामुळे मनसेची दुहेरी कोंडी झाली आहे. शिवाय या मदतीच्या बदल्यात मनसेने राष्ट्रवादी काँग्रेसला स्थायी समिती देण्याचे आश्वासन दिल्याचीही चर्चा आहे.