आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - नितीन गडकरी यांच्याशी सोमवारी झालेल्या भेटीनंतर मंगळवारी मनसेच्या प्रमुख पदाधिका-यांची पुन्हा बैठक पार पडली, मात्र त्यात कोणत्याही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीबाबत मनसेचा अंतिम निर्णय राज ठाकरे स्वत: रविवारी वर्धापन दिन कार्यक्रमात जाहीर करणार आहेत.
लोकसभा निवडणुक लढवावी की नाही या द्विधा मन:स्थितीत मनसे आहे. मंगळवारी याबाबत पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक राज ठाकरेंनी घेतली. या बैठकीत पुन्हा एकदा सर्व शक्यतांवर विचार करण्यात आला. येत्या रविवारी मनसेच्या आठव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पक्षप्रमुख राज ठाकरे मनसेच्या भूमिकेबाबत जाहीर भाष्य करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
आक्रमकता राज यांच्याकडेच
सोमवारी राज ठाकरे आणि भाजपचे माजी अध्यक्ष नितिन गडकरी यांच्या दरम्यान झालेल्या भेटीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महायुतीतल्या भाजपच्या मित्रपक्षांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मात्र राज ठाकरेंनी कोणालाही भेटीसाठी बोलावले नव्हते किंवा त्यांनी गडकरींकडे भेटीची वेळ मागितली नव्हती, असा खुलासा मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांनी बैठकीनंतर केला. उद्धव ठाकरे यांच्या नाराजीकडे लक्ष वेधले असता, त्यांच्या आक्रमक नाराजीपेक्षा राज यांची आक्रमकता कदाचित भाजपला आवडली असेल, असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला.
आमची सर्व तयारी : नांदगावकर
‘ लोकसभा लढवण्याची आमची पूर्ण तयारी असून उमेदवारही तयार आहेत. मात्र याबाबत अंतिम निर्णय राज ठाकरे लवकरच जाहीर करतील,’ असे त्यांच्यासह नांदगावकर यांनी स्पष्ट केले. या बैठकीला आमदार नितीन सरदेसाई, सरचिटणीस अविनाश अभ्यंकर, शिरीष सावंत यांच्यासह कोकणातले नेते परशुराम उपरकर आणि डोंबिवलीचे आमदार रमेश पाटीलही उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.