आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MNS News In Marathi, Lok Sabha Election, Raj Thackeray

मनसेचे इंजिन स्टेशनातच...!,लोकसभा निवडणुकीबाबत नेते गोंधळात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लोकसभा निवडणुकांबाबत कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देता देता मनसेच्या नेत्यांच्या नाकीनऊ आलेत. कारण या निवडणुका लढवायच्या किंवा नाहीत याबाबत मनसेचा अजून निर्णय होत नाही. पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बैठकांवर बैठका झडताहेत, मात्र निवडणुकीबाबत नेमके काय करायचे, याबाबतचा ठोस निर्णय होत नाही. नेत्यांच्या या गोंधळाच्या भूमिकेमुळे राज्यभरातील कार्यकर्तेही अस्वस्थ आहेत.


लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता आता कोणत्याही क्षणी लागू होण्याची शक्यता आहे. त्यातच गेल्या आठवड्यात राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांनी आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत, काँग्रेसही एक- दोन दिवसांत पहिली यादी जाहीर करेल. गेल्या निवडणुकीत भाजप-सेना युतीला फटका देणाºया मनसेच्या तंबूत मात्र यंदा गोंधळाचेच वातावरण आहे. शनिवारी राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी पार पडलेली वरिष्ठ नेत्यांची बैठकही कोणत्याही निर्णयाविनाच पार पडली. आता सोमवारी पुन्हा निवडणुकांची रणनीती ठरवण्यावर खल होणार आहे.


निवडणुका स्वबळावर लढवणे, महायुतीसोबत समझौता करणे किंवा लोकसभा न लढवता थेट विधानसभेच्या तयारीला लागणे या तीन पर्यायांवर मनसेमध्ये गेल्या आठवड्यापर्यंत विचारविनिमय सुरू होता. मात्र, आता महायुतीचे जागावाटप पार पडून शिवसेना आणि भाजपने तर आपल्या उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केल्याने त्यांच्यासोबत जाण्याचा पर्याय संपला असल्याचे मनसेच्या एका नेत्याने सांगितले.


राज यांना नकोय ‘लोकसभा’
पक्षातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनसेने लोकसभा निवडणूक लढवू नये, असे खुद्द राज ठाकरेंचेच मत आहे. मात्र, या निर्णयामुळे पक्षाचे कार्यकर्ते संभ्रमित होऊन इतर पक्षांच्या आमिषाला बळी पडण्याची भीती असल्यामुळे स्वबळ आजमावून पाहावे, असा काही नेत्यांचा आग्रह आहे. या द्विधा मन:स्थितीमुळे पक्षाचा अजूनही निर्णय होत नसल्याचे कळते. त्यातच बारा ते पंधरा जागा लढवायच्या झाल्यास उमेदवारांचीही चणचण मनसेला जाणवणार आहे. पक्षाचे बहुतांश नेते निवडणूक लढवण्याबाबत उत्सुक नाहीत.


नैराश्याचे वातावरण
येत्या 9 मार्चला मनसेचा आठवा वर्धापन दिन आहे. दरवर्षी वर्धापन दिन कार्यक्रमात पक्षप्रमुख राज ठाकरे आपल्या भाषणातून वर्षभराचा कार्यक्रम कार्यकर्त्यांना देत असतात. मात्र, या वर्षी पक्षाच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रमसुद्धा कुठे होणार हे निश्चित झालेले नाही. आठ वर्षांच्या वाटचालीत इतकी निराशाजनक आणि बेभरवशाची स्थिती आपण कधीच अनुभवली नसल्याची बोलकी प्रतिक्रिया मनसेच्या एका वरिष्ठ पदाधिका-याने दिली.


बालेकिल्ल्यातही शांतता
लोकसभा व विधानसभा या दोन्ही निवडणुकांचा खर्च झेपणारा नाही अशी भूमिका बहुतांश आमदारांनी घेतल्याने मुंबई, नाशिकसारख्या बालेकिल्ल्यातही मनसेला नव्या उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये ज्या 12 जागांवर उमेदवार उभे केले होते, तिथेही आता पक्षाच्या काहीच हालचाल दिसत नाहीत, अशी माहिती दक्षिण मुंबईतल्या एका पदाधिकाºयाने दिली. त्यामुळे अशा वातावरणात जरी निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला, तरीही त्यातून पक्षाच्या हाती काहीच पडणार नसल्याचे एकंदर चित्र आहे.


मताधिक्य घटण्याची मनसेला भीती
गेल्या लोकसभेत मुंबईतल्या सहा जागा, ठाण्यातल्या दोन जागा, नाशिक, पुणे, औरंगाबाद आणि भिवंडीत प्रत्येकी एक अशा बारा जागांवर मनसेने उमेदवार उभे केले होते. यातल्या प्रत्येक उमेदवाराला किमान लाखभर मते मिळाली होती. ईशान्य मुंबईत शिशिर शिंदे आणि नाशकात हेमंत गोडसे यांनी तर दोन लाखांचा टप्पा गाठला होता. या वेळी या मतदारसंघात जर गेल्यावेळेपेक्षा कमी मते मिळाली, तर त्याचा नकारात्मक परिणाम विधानसभेत होईल, असे मत काही नेत्यांनी व्यक्त केल्याचे कळते.


आदित्य शिरोडकरांचे प्रचारकार्य बंद
राज ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि पक्षाचे सरचिटणीस राजन शिरोडकर यांचा मुलगा आदित्य शिरोडकर यांना दक्षिण मध्य मुंबईत तयारीला लागण्याचे संकेत खुद्द राज ठाकरेंनी सहा महिन्यांपूर्वी दिले होते. त्यानुसार कामाला सुरुवात केलेल्या आदित्य शिरोडकरांच्या शुभेच्छांचे बॅनर्स गणेशोत्सव आणि दिवाळी दरम्यान दिसले होते; पण आता निवडणुका तोंडावर असताना शिरोडकरांनीही प्रचार काम बंद करणे हिच पक्षाची रणनीती स्पष्ट करण्यास पुरेसे असल्याची प्रतिक्रिया एका पदाधिकाºयाने दिली.