आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाणे बंदला विरोध; नगरसेवक, आमदारांवर केव्हा करणार कारवाई ? राज ठाकरेंचा सवाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अनधिकृत बांधकामाविरोधात गुरुवारी आयोजित ठाणे बंदला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा नाही, असे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

अनधिकृत बांधकामाला राजकीय हस्तक्षेपच जबाबदार आहे. राज्यात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि ठाणे महापालिका ज्यांच्या ताब्यात आहे त्या शिवसेनेने आयोजित केलेला बंद, हे राजकीय ढोंग असल्याचा आरोप ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

बेकायदेशीर आणि धोकादायक इमारतींविरोधात सुरू झालेल्या कारवाईच्या विरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने गुरूवारी ठाणे बंदची हाक दिली आहे. या इमारतींमधील नागरिकांच्या पूनर्वसनाचा प्रश्न आधी मार्गी लावा, असा सूर या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आळवला आहे. व्होट बँकेच्या रक्षणासाठी हा बंद आहे असल्याचा आरोप आधीपासून राज ठाकरे यांनी केला आहे. ठाणेकर नागरिकांनी बंद मध्ये सहभागी होऊ नये असे आवाहन त्यांनी केले आहे.

अनधिकृत बांधकामामुळे शहराच्या नियोजनावर परिणाम होतो. अनधिकृत बांधकाम कोणत्याही पक्षाच्या नेत्याचे असले तरी ते पाडलेच पाहिजे, असे ठाकरे म्हणाले. अनधिकृत बांधकाम करणा-या मनसेच्या पदाधिका-यांना पक्षात ठेवणार नाही, असेही त्यांनी सुनावले.

अनधिकृत बांधकाम करणा-या बिल्डरला शिक्षा करा, यासाठी बोलायला कोणीही तयार नाही. त्यांना स्थानिक नगरसेवक, आमदार यांचे सहकार्य असल्याशिवाय अनधिकृत इमारती उभ्या राहू शकत नाही. ज्यांच्या आशीर्वादाने इमारती उभ्या राहतात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे.

ठाणे पालिकेचे एक-दोन अधिकारी निलंबीत केले गेले. मात्र, नगरसेवक, आमदार आणि या बिल्डरांना मदत करणा-या पालिका अधिका-यांना कधी निलंबीत करणार, असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

या इमारती बांधणा-यां विरोधात आणि त्यांना पाठिंबा देणा-यांविरोधात जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत या बंदला काहीही अर्थ नसल्याचे ते म्हणाले.